ऐकावे ते नवलच ! उंदरांच्या शिकारीसाठी मांजरांचे अपहरण, दोघे रंगेहाथ ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 05:20 PM2021-12-11T17:20:42+5:302021-12-11T17:23:15+5:30
Take Care Of Your Cats : मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात मांजरीचे अपहरण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
औरंगाबाद : रोपेवाटिका, नर्सरीत हैदोस घालणाऱ्या उंदरांची शिकार करण्यासाठी मांजराचे अपहरण (kidnapping of cats for rat hunting) केल्याचा प्रकार मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगरमध्ये उघडकीस आला आहे. नागरिकांनी मांजरे पकडणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले. या दोघांच्या विरोधात प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटी संघटनेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Take Care Of Your Cats )
मुकुंदवाडी परिसरात मांजरींना मटणाचे तुकडे टाकून गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू होता. मटणाच्या आशेने आलेले मांजर गळाने पकडून पिशवीत टाकण्यात येत होते. दुचाकीवरून (टीएस ०७ एचएस ६२९८) दोघे परिसरात फिरत होते तेव्हा अमोल चव्हाण यांनी मांजरी पकडत असल्याची माहिती प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटी संघटनेचे सदस्य श्रीनिवास नंदलाल धुप्पड यांना दिली. धुप्पड यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. काही वेळांतच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा दुचाकीवरून मांजरी शोधत असलेल्या दोघांना चव्हाण व धुप्पड यांनी गाठले. विचारपूस करताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने पकडले. त्या दोघांचे करुणाकर शामसन गंटा (१९) आणि लोकेश शिवय्या कटा (१९, दोघे रा. मूळ गाव शंकरपल्ली, जि. रंगारेड्डी, तेलंगणा, ह.मु. इंदेवाडी झोपडपट्टी, जालना) अशी नावे आहेत. या दोघांना नागरिकांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पकडून आणले. त्याठिकाणी धुप्पड यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोघांच्या ताब्यातील मांजर जप्त करत सोडून देण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक संदीप वाघ करत आहेत.
मांजरांची नर्सरीमध्ये विक्री
पकडलेल्या मांजरी विविध नर्सरींमध्ये विक्री करण्यात येत असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली आहे. या मांजरी नर्सरीतील उंदारांची शिकार करतात. त्यामुळे त्यांना नर्सरीचे मालक चांगली किंमत देतात. पकडलेले दोन्ही आरोपी केस गोळा करून उदरनिर्वाह करणारे आहेत. त्याच्या जोडीला हा व्यवसाय करत असल्याचेही चौकशी समोर आले आहे.
वनविभागाने केले हात वर
मुकुंदवाडी पोलिसांनी मांजर पकडून घेऊन जात असल्याच्या प्रकाराची माहिती पत्राद्वारे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाळीव प्राण्याच्या संदर्भात आम्ही कोणतीही कारवाई करत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पोलिसांनीच पकडलेल्या दोन युवकांवर गुन्हा दाखल केला.