ऐकावे ते नवलच ! 'येथे' नवरदेवाचे कपडे विकत घेतले जातात; ‘ब्लेझर’ नव्हे तर ‘शेरवानी’ला मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 08:05 PM2022-01-22T20:05:27+5:302022-01-22T20:07:17+5:30
घरात पडून राहण्यापेक्षा शेरवानी विकून टाकण्याचा ट्रेंड वाढू लागला आहे.
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : ‘आमच्या येथे नवरदेवाचे कपडे विकत मिळतील’ अशा पाट्या आपण अनेक दुकानांत पाहिल्या असतील, आता ‘येथे नवरदेवाचे कपडे विकत घेतले जातील’ अशा पाट्या नजरेस पडल्या तर नवल वाटायला नको. कारण, आता असा व्यवसाय शहरात सुरू झाला आहे.
हे वाचल्यानंतर ‘ऐकावे ते नवलच’ असे शब्द नकळत तुमच्या तोंडून बाहेर पडले असतील. मात्र, मुंबई, पुणे, बंगळुरू अशा मोठ्या शहरांत नवरदेवाने लग्नात एकदाच वापरलेला पोशाख खरेदी करण्याचा व्यवसाय मागील ५ वर्षांत जोमात वाढला. औरंगाबादमध्ये मागील २ वर्षांपासून म्हणजे कोरोना काळापासून नवरदेवाचे कपडे खरेदी करण्यास सुरुवात झाली.
कपडे विकत घेणारे ‘शेरवानी’ला प्राधान्य देतात. कारण, शेरवानी सर्वांत महाग असते. भरजरी शेरवानी लग्नाच्या दिवशी किंवा स्वागत सोहळ्याच्या दिवशी नवरदेव हौशीने परिधान करतात व नंतर आयुष्यभर ती शेरवानी कपाटात पडून राहते. कोट, ब्लेझर अन्य कार्यक्रमात, ऑफिसमध्ये वापरले जातात. त्यामुळे घरात पडून राहण्यापेक्षा शेरवानी विकून टाकण्याचा ट्रेंड वाढू लागला आहे. कारण आता नाटके, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कॉश्च्युम भाड्याने देणारेच शेरवानी विकत घेत आहेत. महिना ते एक वर्ष जुनी शेरवानी व्यापारी खरेदी करतात. कारण, दरवर्षी शेरवानीमध्ये ट्रेण्ड बदलतो आहे.
मिळते १० टक्के रक्कम
१५ हजार रुपयांत खरेदी केलेली शेरवानी विकल्यास त्याचे १० टक्के म्हणजे जेमतेम १५०० रुपये मिळतात. एकदा शेरवानी वापरली की त्याची किंमत मार्केटच्या भाषेत थेट ९० टक्क्यांनी कमी होते.
आयटी क्षेत्र व एनआरआय नवरदेवही विकतात शेरवानी
दुकानदारांनी सांगितले की, शेरवानी विकायला येणाऱ्यांमध्ये आयटी क्षेत्रातील नवरदेव, एनआरआयची संख्या जास्त असते. कारण ‘युज अँड थ्रो’ ट्रेंड व दुसरे या लोकांना ब्लेझर, कोट-सूटमध्ये नेहमी वावरावे लागते. लग्नानंतर शेरवानी घालण्याचे काम पडत नाही.
भाड्याच्या ड्रेसवर लग्न
५० जणांत लग्न लावायचे तर एका दिवसासाठी महागडे कपडे विकत घेण्याऐवजी भाड्याची शेरवानी घेणारे कमी नाहीत, असे व्यापाऱ्यांनी नमूद केले.