बहुजन सुखाय नव्हे दुखाय...गर्भवतीसह सहा महिलांना रात्री बसमध्येच करावा लागला मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 03:33 PM2018-12-06T15:33:34+5:302018-12-06T15:35:15+5:30
बस निकामी झाल्याचे आगाराला कळवूनही पर्यायी बस पाठविली नाही.
सोयगाव (औरंगाबाद ) : सोयगाव आगाराची औरंगाबाद-अंधारी-पाचोरा ही बस मंगळवारी सायंकाळी शेलगाव-नाचनवेल रस्त्यावर निकामी झाल्यामुळे एका गर्भवती महिलेसह ६ महिलांना रात्रभर बसमध्येच मुक्काम करण्याची वेळ आली. बस निकामी झाल्याचे आगाराला कळवूनही पर्यायी बस पाठविली नाही. या प्रकाराबाबत प्रवाशांनी रोष व्यक्त केला आहे.
सोयगाव आगाराची औरंगाबाद-अंधारी-पाचोरा ही एकमेव बस ( एम. एच-२१ बी.एल-२१९८)औरंगाबाद स्थानकावरून दुपारी १ वा. सुटली . ही बस ५ वाजता नाचनवेलहून निघाली व रस्त्यातच निकामी झाली. चालक, वाहकाने बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळ झाली तरीही बस सुरू झालीच नाही. यामुळे वाहक आर. एम. गाढे यांनी सोयगाव बस आगाराला दूरध्वनीवरून रिलीफ बस पाठविण्याची विनंती केली.
सिल्लोड आगार जवळ असल्याचे कारण सांगून सोयगाव आगारातील प्रमुखांनी सिल्लोडला दूरध्वनी करून रिलीफ बससेवा व दुरुस्ती पथकाला पाचारण करण्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत सिल्लोड आगाराचे दुरुस्ती पथक आलेच नाही.
बसमधील ४० प्रवाशांनी बसभाडे परतीची मागणी केली. काही प्रवाशांना वाहकाने ११४० रुपये परत केले. त्यामुळे काहींनी दुचाकी तसेच ट्रॅक्टरवर बसून पुढचा रस्ता धरला. मात्र, सिल्लोड आगाराच्या दुरुस्ती पथकाच्या भरोशावर राहिलेल्या एका गर्भवतीसह ६ महिलांना बसमध्येच रात्रभर मुक्काम करावा लागला.
मध्यरात्री दुरुस्ती पथक
मध्यरात्री उशिरापर्यंत सिल्लोड आगाराचे दुरुस्ती पथक घटनास्थळी पोहोचले. बस दुरुस्तीसाठी पहाटे ४ वाजले. औरंगाबादहून मंगळवारी दुपारी निघालेली बस बुधवारी सकाळी पाचोऱ्यावरून सोयगावला पोहोचली.
माणुसकीचे दर्शन
पाचोरा-अंधारी-औरंगाबाद या मार्गावरून ही सोयगाव आगाराची एकमेव बस सुरूआहे.वर्दळीचा नसलेला हा रस्ता केवळ या बसच्या नावाने ओळखला जातो. बसमध्ये अडकलेल्या महिला प्रवाशांना चालक व वाहकाने पायी जाऊन खिशातून पैसे खर्च करून पिण्याचे पाणी व खाण्याचे साहित्य उपलब्ध करून दिले.