‘तो मी नव्हेच’ ते ‘तो मीच’; फरार आरोपींच्या यादीत सहायक सरकारी वकील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 02:52 PM2020-11-06T14:52:03+5:302020-11-06T14:58:08+5:30
शिवसेनेने काही वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांवर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
औरंगाबाद : शहर पोलिसांच्या फरार आरोपीच्या यादीत सहायक सरकारी वकिलाचे नाव आहे. पोलिसांनी त्या वकिलाला बोलावून घेतले, तेव्हा वकिलाने ‘तो मी नव्हेच’, अशी भूमिका घेतली. पोलिसांनी पुरावे सादर करताच त्यांनी ‘तो मीच आहे’, अशी कबुली दिली.
शिवसेनेने काही वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांवर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या आंदोलनातील कार्यकर्त्यांना अटक करून पोलिसांनी त्यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, आंदोलकांपैकी एक राजू पहाडिया हे न्यायालयात हजर झाले नाहीत. न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध समन्स आणि नंतर अटक वॉरंट काढले. एवढेच नव्हे तर पहाडिया हे सापडत नाहीत, असा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले.
फरार आरोपींची यादी प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी राजू पहाडिया यांना शोधण्याचे आदेश क्रांतीचौक पोलिसांना दिले. तपासाअंती पोलिसांच्या यादीतील फरार आरोपी जिल्हा न्यायालयातील सहायक सरकारी वकील राजू पहाडिया हेच असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना बोलावून विचारणा केली तेव्हा सुरुवातीला त्यांनी ‘तो मी नव्हेच’, अशी भूमिका घेतली. पोलिसांनी पुरावे सादर केल्यावर, मी तेथे आंदोलकांचा वकील म्हणून हजर होतो, अशी सफाई दिली. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर होऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याची माहिती सूत्राने दिली.
फरार आरोपींचा शोध घेत असताना आम्हाला सरकारी वकील आणि सरकारी अधिकाऱ्यांची नावेही दिसली. अशा लोकांना न्यायालयात हजर करून यादीतील आरोपींची संख्या कमी करण्यावर आमचा भर आहे.
- निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त