झाली का पंचाईत ! सरपंचपदाचे आरक्षण निघाले मात्र गावात पात्र उमेदवारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:46 PM2021-02-06T17:46:09+5:302021-02-06T17:48:23+5:30

पैठण तालुक्यातील ढाकेफळ, एकतुणी व आडूळ (खु) या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण निघालेल्या प्रवर्गातील सदस्य तेथे निवडणून आले नाहीत.

its a trouble ! The reservation for Sarpanch post has been made but there is no eligible candidate in the village | झाली का पंचाईत ! सरपंचपदाचे आरक्षण निघाले मात्र गावात पात्र उमेदवारच नाही

झाली का पंचाईत ! सरपंचपदाचे आरक्षण निघाले मात्र गावात पात्र उमेदवारच नाही

googlenewsNext
ठळक मुद्देया ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त राहणार आहे.तेथे उपसरपंच कामकाज पाहतील

पैठण : न्यायालयीन प्रक्रियेत लांबलेले पैठण तालुक्यातील आरक्षण अखेर शनिवारी काढण्यात आले. परंतु, सोडती दरम्यान तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीचे निघालेले आरक्षण लक्षात घेता त्या प्रवर्गातील सदस्यच या ग्रामपंचायतीत निवडून आलेला नसल्याने आता सरपंच कुणाला करायचे असा मोठा प्रश्न निवडून आलेल्या सदस्यांसमोर उभा राहिला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी या गावातील सदस्य न्यायालयात जाणार असल्याने पैठण तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाचा पेच पुन्हा उभा राहतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीचे आरक्षण पुन्हा तेच आल्याने आरक्षण लांबले होते. न्यायालयाच्या आदेशाने शनिवारी अखेर सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. या आरक्षणात ढाकेफळ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला साठी निघाले आहे. तर एकतुणी व आडूळ खुर्द येथील सरपंचपद अनुसूचित जाती महिला साठी राखीव झाले आहे. वास्तविक या ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी निघालेल्या प्रवर्गातील सदस्यच निवडून आलेला नाही. यामुळे या ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त राहणार आहे.

ढाकेफळ ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी निघालेल्या आरक्षणातील सदस्य नसल्याने. निवडून आलेल्या एकाही सदस्यास सरपंच होता येणार नाही.  प्रशासनाने आरक्षण काढताना याचा विचार केलेला दिसत नाही. यामुळे आम्ही यासाठी न्यायालयात दाद मागणार आहोत अशी प्रतिक्रिया ढाकेफळ येथील पँनल प्रमुख तुषार शिसोदे यांनी दिली आहे.

तेथे उपसरपंच कामकाज पाहतील
ढाकेफळ, एकतुणी व आडूळ (खु) या ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठी आरक्षण निघालेल्या प्रवर्गातील सदस्य नसल्या बाबत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना विचारले असता त्यांनी हे आरक्षण बदल करता येत नाही. या ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त राहील तेथे उपसरपंच कामकाज पाहतील अशी माहिती दिली आहे.

Web Title: its a trouble ! The reservation for Sarpanch post has been made but there is no eligible candidate in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.