आईविना पोरकी दुधावरची ‘साय’ली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:13 AM2018-01-24T01:13:32+5:302018-01-24T01:14:01+5:30
‘जिणं फाटतंया, तिथंच ओवावा धागा गं... बाई दु:खाच्या कष्टाने लिपाव्या भेगा....’ या ओळी सार्थ ठरविल्या चापानेर येथील एका शिंपी (टेलर) कुटुंबाने. मुलीला गर्भातच संपविण्याची चढाओढ लागल्याचे वारे सध्या वाहते आहे. घरात दोन मुलासह खाणारी चार तोंडे आणि त्यात रोजंदारीची मारामार असतानाही या दिलदार शिंपी कुटुंबाने तीन दिवसाच्या बालिकेस (सायली ऊर्फ संध्या) दत्तक घेऊन तिचे आनंदाने भरणपोषण केले अन् तिचा दुसरा वाढदिवस उत्साहाने साजरा करून मनाचा मोठेपणाही दाखविला.
संतोष सोमासे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चापानेर : ‘जिणं फाटतंया, तिथंच ओवावा धागा गं... बाई दु:खाच्या कष्टाने लिपाव्या भेगा....’ या ओळी सार्थ ठरविल्या चापानेर येथील एका शिंपी (टेलर) कुटुंबाने. मुलीला गर्भातच संपविण्याची चढाओढ लागल्याचे वारे सध्या वाहते आहे. घरात दोन मुलासह खाणारी चार तोंडे आणि त्यात रोजंदारीची मारामार असतानाही या दिलदार शिंपी कुटुंबाने तीन दिवसाच्या बालिकेस (सायली ऊर्फ संध्या) दत्तक घेऊन तिचे आनंदाने भरणपोषण केले अन् तिचा दुसरा वाढदिवस उत्साहाने साजरा करून मनाचा मोठेपणाही दाखविला.
जेमतेम १२ वी पर्यंत शिक्षण झालेले विजय उत्तम चव्हाण (वय ३७) चापानेरात टेलरिंग काम करतात. पत्नी व दोन मुलांचे हे चौकोनी कुटुंब. पहिला मुलगा सात तर दुसरा पाच वर्षाचा आहे. १६ वर्षापूर्वी त्यांच्या गव्हाली (तांडा) या गावातून चापानेरात पोटापाण्यासाठी येऊन राहिले. दोनवर्षापूर्वीची ही घटना. चव्हाण कुटुंबिय राजदेहारे (ता. चाळीसगाव जि .जळगाव) येथे पत्नीच्या चुलत बहिणीला मुलगी झाली म्हणून भेटायला गेले. दुर्दैव असे की, बाळंतपणाच्या तिसºया दिवशी ती माता दगावली म्हणून ही तीन दिवसाची बालिका तिच्या वडिलांना नकोशी झाली .चिमुकलीचे वडील प्रकाश रामदास चव्हाण यांना अगोदरच दोन मुली. त्यात पत्नीचे निधन. मग काहींनी या मुलीला अनाथाश्रमात सोडण्याचा सल्ला दिला. हे पाहून विजय चव्हाण यांनी पत्नी वैशालीसोबत चर्चा करून त्या चिमुरडीस दत्तक घेतले व चापानेर येथील घरी आणले .
चव्हाण यांचे लहानसे भाड्याचे घर व दुकान. त्यातही चिमुरडी दोन भावात आनंदाने वाढतेय. दर पंधरा दिवसाला ते मुलीला घेऊन लस व डोस देण्यासाठी चापानेरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात . तिचा पहिला वाढदिवस मागील महिन्यात थाटात साजरा केला . या कुटुंबाची अर्थिक परिस्थिती बेताचीच. जिद्द ,कष्ट व मेहनतीच्या जोरावर आनंदाने ते संसाराचा गाडा ओढत आहेत.
आॅपरेशनसाठी
पैशाची
जुळवाजुळव
जन्मत: ह्या मुलीच्या डोक्यावर बेंड आहे. त्यावर उपचार सुरु आहेत, मुलगी तीन ते चार वर्षाची झाल्यानंतर आॅपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यासाठी २५ ते ३० हजार रुपये खर्च सांगितला आहे. या पैशाची जुळवाजुळव या कुटुंबाने आतापासूनच सुरू केली आहे.
अपघातात
जीवदान मिळाल्याने केले सत्कार्य
विजय चव्हाण हे नऊ वर्षापूर्वी मोठ्या अपघातातून वाचले. आपल्याला देवाने जीवदान दिले मग आपणही कोणाला तरी जीवदान देऊ शकतो, या विचारातून त्यांनी मुलीला दत्तक घेतले आणि तिचा काळजीपूर्वक सांभाळही करत आहेत.