जब्बारचा मारेकरी बबला अटकेत; बेगमपुरा पोलिसांनी सिल्लोड येथून घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:21 AM2018-06-02T11:21:45+5:302018-06-02T11:22:39+5:30
फरार झालेला कुख्यात शेख वाजेद शेख असद ऊर्फ बबला (२५, जहांगीर कॉलनी, जटवाडा रोड) याला अखेर बेगमपुरा पोलिसांनी सिल्लोड येथून गुरुवारी रात्री अटक केली.
औरंगाबाद : हिलाल कॉलनी येथील प्लंबर शेख जब्बार शेख गफ्फार याची अपहरणानंतर हत्या करून मृतदेह दौलताबाद येथील विहिरीत टाकून फरार झालेला कुख्यात शेख वाजेद शेख असद ऊर्फ बबला (२५, जहांगीर कॉलनी, जटवाडा रोड) याला अखेर बेगमपुरा पोलिसांनी सिल्लोड येथून गुरुवारी रात्री अटक केली. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी त्याला सात जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बेगमपुरा ठाण्याचे प्रभारी अधिकारी फौजदार राहुल रोडे यांनी सांगितले की, २० मे रोजी जब्बारचा मृतदेह विहिरीत सापडला. जब्बारच्या खून प्रकरणात पोलिसांनी याआधी चौघांना अटक केली होती आणि सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक केलेल्यांमध्ये आरोपी मोहम्मद अलीमुद्दीन ऊर्फ अलीम अन्सारी मोहम्मद मीनाजोद्दीन, शेख इम्रान ऊर्फ बाबा लोली शेख करीम, शेख कलीम ऊर्फ कल्लू शेख सलीम यांचा समावेश होता. शेख अमजद आणि त्याचा भाऊ बबला आणि मोहम्मद रिहान रिजवान, तसेच सिकंदर हे फरार होते. पूर्वी पकडलेल्या तीन आरोपींना न्यायालयीन कोठडीअंतर्गत हर्सूल कारागृहात पाठविण्यात आले आहे, तर कलीम पोलीस कोठडीत आहे.
झोपेत असतानाच केली अटक
गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सिल्लोडच्या आंबेडकर चौकात एका दुकानासमोर बबला झोपल्याची माहिती फौजदार राहुल रोडे यांना कळली. शोध पथकातील अविनाश जाधव, श्रीकांत सपकाळ, नामदेव सानप, नागेश पांडे सिल्लोड येथे दाखल झाले. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बबला झोपलेला होता. त्याला कुठेही झोपण्याची सवय आहे. खातरजमा करून त्याला अटक केली. बबलाच्या विरोधात लुटमार, जखमी करणे, खून, असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या टोळीवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पाठीवर बॅग व त्यात कपडे
पोलिसांनी बबलाला पकडले तेव्हा तो पोलिसांना झटका देऊन पळून जाण्याच्या तयारीत होता. बेगमपुरा पोलिसांसाठी सतत आव्हान देत शहराबाहेर राहून पोलिसांना फोनवर संपर्क साधून स्वत:चा पत्ता १५ दिवस बदलत राहिला. त्याच्या सोबत एक पिशवी होती. त्यात कपडे आढळून आले. अमजद हा फरार असून, त्यालाही लवकरच पोलीस पकडतील, असे फौजदार रोडे यांनी सांगितले.