निवडणूक लढविण्याचे जाहीर करून जाधवांचे खैरेंना खुले आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 08:39 PM2018-10-19T20:39:40+5:302018-10-19T20:40:33+5:30
येणारी लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर करून त्यांनी खैरेंना शिवराळ भाषेत खुले आव्हान दिले.
औरंगाबाद : शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. हर्षवर्धन जाधव यांनी पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त खा. चंद्रकांत खैरेंवर तुफान शब्दहल्ला चढवून राजकीय सीमोल्लंघन केले. येणारी लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर करून त्यांनी खैरेंना शिवराळ भाषेत खुले आव्हान दिले.
वाकी संस्थानचे सुखदेव महाराज यांच्या हस्ते जालना रोड, समर्थनगर येथील पक्षकार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी पाऊणतास भाषणात शिवसेना पक्षप्रमुख, मनसेप्रमुख यांच्यासह खा. खैरे यांना टीकेचे लक्ष्य करीत आरोपांच्या फैरी झाडल्या. यावेळी माजी आ. तेजस्विनी जाधव, संजना जाधव, आदित्यवर्धन जाधव आदींची उपस्थिती होती.
आ. जाधव यांनी खा. खैरे यांना वेगवेगळी विशेषणे देऊन त्यांचा आवाज काढून टीका केली. शहरात कचरा पेटला आहे, पाणीपुरवठा होत नाही, रस्त्यांची वाट लागलेली असताना ‘जय महाराष्ट्र’ म्हणायचे, कडक कपडे घालून मिरवायचे, स्वत:ला हिंदुरक्षक म्हणवून घ्यायचे आणि मातोश्रीवर डोके टेकायचे या पलीकडे त्यांनी काय केले. आदित्य ठाकरे यांच्यादेखील ते पाया पडले.
हिंदूंसाठी ते कितीदा तुरुंगात गेले हे दाखवून द्यावे. तुरुंगवास दुसऱ्यांनी भोगायचा आणि सत्तेत्त यांनी बसायचे. दोन तास क्रांतीचौक पोलीस ठाण्यात यांनी हिंदूंसाठी तुरुंगात बसावे. मी खैरेंच्या पायाखालून जाईन, असे आव्हान देत आ. जाधव म्हणाले, मला खा. खैरे वेडा म्हणतात; परंतु वेडी माणसेच क्रांती करतात. मतदारसंघात मी १५० मंदिर सभागृहे बांधली. खैरेंनी जाहीरपणे सांगावे किती मंदिर सभागृहे बांधून दिली. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावरही आ. जाधव यांनी तोंडसुख घेतले.
ते म्हणाले की, ठाकरे दिवसभर सनसन भाषणातून झोडपायचे आणि संध्याकाळी कुणी भेटले की, पंक्चर व्हायचे. त्यामुळे तेथेही विचार जुळले नाहीत. याप्रसंगी १४ वर्षीय आदित्यवर्धनने केलेले भाषण लक्षवेधी ठरले. त्याने एकेक करून शहरातील समस्यांचा पाढा मांडत शिवस्वराज्य पक्षाची भूमिका मार्मिकपणे मांडली.
सत्तेला लाथ मारायला हवी होती
शिवसेनेने मराठा आरक्षणासाठी सत्तेला लाथ मारून बाहेर पडणे गरजेचे होते. मी आरक्षणाच्या बाजूने बोललो, तर माझे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. पक्षशिस्त मोठी असते, असे सांगून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. साहेब आले, साहेब उठले, साहेब बसले, अशा पक्षशिस्तीपेक्षा तिथे न राहिलेले बरे. त्यामुळे सामान्यांसाठी सामन्य विचारांचा पक्ष काढला. पक्षशिस्त म्हणून काहीच बोलायचे नाही आणि मातोश्रीवर जाऊन हुजरेगिरी करायची. शिवसेनेत हुजरेगिरी करणाऱ्यांना महत्त्व आले आहे. शिवसेनेचा जन्म लुंगी-पुंगीवाल्यांच्या विरोधात झाला. शिवसेनाप्रमुखांनी पक्ष वाढविला. आता पक्षात हुजरेगिरी वाढल्यामुळे पक्षाची वाट लागल्याचा घणाघाती हल्ला जाधव यांनी चढविला.
सर्व काही सेंटिंग करतात
खैरे दर शनिवारी भद्रा मारुती, शनिशिंगणापूरला जातात. दुसऱ्यांच्या कलेचे ओझे वाहतात. खासदाराची चारित्र्यसंपन्नता चांगली असली पाहिजे. लोक त्यांच्यापाठीमागे काहीही बोलतात. दंगली करून आता खासदार होता येणार नाही. काँगे्रस, भाजप, एमआयएमचे उमेदवार मॅनेज करतात. एमआयएमचे खा. ओवेसी यांच्याकडे हैदराबादाला जाऊन भेटतात. स्वपक्षातदेखील तिकिटे मॅनेज करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. अर्धशिक्षित माणूस कितीवेळा निवडून देता, आता बस्स झाले, त्या ग...ड्या...आणि दिल्लीत जाऊन ड्रॉव... ड्रॉव करणाऱ्यापेक्षा मी चांगले काम करू शकतो, असे बोलून खैरेंना खुले आव्हान देत जाधव यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याचे जाहीर केले.