जाधववाडी कृउबात आज सभापतीची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:11 AM2017-09-01T01:11:39+5:302017-09-01T01:11:39+5:30
जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठीची निवडणूक उद्या १ सप्टेंबर रोजी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठीची निवडणूक उद्या १ सप्टेंबर रोजी होणार आहे.
जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय औताडे (काँग्रेस) यांच्या विरोधात भाजपच्या संचालकांनी आणलेला अविश्वास ठराव २२ रोजी पारित झाला होता. काँग्रेसचे ३ संचालक फोडण्यात भाजपला यश आले असून, १३ विरुद्ध शून्य एवढ्या फरकाने औताडे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. यामुळे सध्याच्या संचालकांमधूनच नवीन सभापती निवडीसाठी १ सप्टेंबरचा मुहूर्त काढण्यात आला आहे. बाजार समितीच्या हॉलमध्ये सकाळी ११.३० वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. प्रथम उमेदवारी दाखल करणे, उमेदवारी मागे घेणे, आक्षेप नोंदविणे, अशी एकानंतर एक निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान घेण्यात येणार आहे. साधारणत: दुपारी २.३० वाजता निकाल जाहीर करण्यात येईल. १८ संचालकांपैकी आजघडीला भाजपकडे १३ संचालकांचे बहुमत आहे. यात काँग्रेसचे बाबासाहेब मुगदल, राधाकिसन पठाडे व शिवाजी वाघ यांनी भाजपला साथ दिली, तसेच हमाल-मापाडी संचालक देवीदास कीर्तिशाही यांनीही काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या ठरावाला पाठिंबा दिला.
भाजपचे ७ संचालक, २ व्यापारी संचालक व ३ काँग्रेसचे संचालक व १ हमाल-मापाडी, असे १३ मते अविश्वास ठरावाच्या बाजूने पडले होते. सभापती निवडून येण्यासाठी १० मतांची आवश्यकता लागते. कोणी संचालक फुटले नाही तर भाजपचा सभापती होणार हे निश्चित. निवडणूक अधिकारी म्हणून सहायक निबंधक देवयानी वहाणे (भारस्वाडकर) काम पाहणार आहेत. त्यांना बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ सहकार्य करणार आहेत.