जाधववाडीतील खुनाचा झाला उलगडा; प्रेयसीला छेडल्याने संतापून दगडाने ठेचून तरुणाने केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 03:49 PM2021-06-08T15:49:53+5:302021-06-08T15:58:04+5:30
सिडको पोलिसांनी केला खुनाचा उलगडा
औरंगाबाद : प्रेयसीसह घरातून पळून आलेल्या तरुणाने नवा मोंढा जाधववाडी येथे २० मेच्या रात्री टेलरचा दगडाने ठेचून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले. घटनेच्या रात्री तो तिला घेऊन जाधववाडीतील व्यापारी संकुलाच्या गच्चीवर झोपायला गेला होता. तेथे मयताने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याने खून केल्याची कबुली आरोपीने सिडको पोलिसांना दिली. सुनील जयसिंग निंभोरे (२६, रा. मिसारवाडी) असे आरोपीचे नाव आहे. दादाराव सांडूजी सोनवणे (४५, रा. सुरेवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नवा मोंढा जाधववाडी येथील जनरल व्यापारी संकुलाच्या छतावर अज्ञात व्यक्तीने सोनवणे यांचा दगडाने ठेचून खून केल्याचे २१ मे रोजी सकाळी आढळून आले होते. याप्रकरणी सिडको ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. घटनेपासून आजपर्यंत पोलीस या घटनेच्या विविध पैलूंवर बोट ठेवून तपास करीत होते. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागत नव्हते. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त रवींद्र साळोखे या तपासावर रोज लक्ष ठेवून असत. दरम्यान नवा मोंढा येथील एका हॉटेलवर संशयित आरोपी सुनील आल्याची माहिती खबऱ्याने पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना सोमवारी दिली. पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके, बाळासाहेब आहेर, हवालदार सुभाष शेवाळे, नरसिंग पवार, प्रकाश डोंगरे, सुरेश भिसे, विशाल सोनवणे आणि गणेश नागरे यांनी त्याला पकडण्यासाठी तेथे धाव घेतली. यावेळी पोलिसांना पाहून सुनील पळून जाऊ लागताच पोलिसांनी त्यास पकडले. त्याला ठाण्यात नेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पोलिसांना सांगितले की, त्या घटनेच्या काही दिवसांपूर्वी तो प्रेयसीला घेऊन घरातून पसार झाला होता. तिच्यासह इकडेतिकडे भटकत असताना २० मेच्या रात्री १० वाजता जाधववाडी येथे तो गेला. तेथील व्यापारी संकुलाच्या छतावर प्रेयसीला घेऊन गेला. तेथे मयत सोनवणे खिचडी घेऊन बसलेले होते. प्रेयसीला तेथे सोडून सुनील लघुशंका करण्यासाठी बाजूला गेला असता सोनवणेने तिच्यासोबत गैरवर्तन केले. याचा राग आल्याने तेथे पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून सोनवणे यांच्या डोक्यावर तीन ते चार वेळा मारून त्यांना ठार केल्याचे तो म्हणाला. यानंतर प्रेयसीला घेऊन तेथून जवळच असलेल्या दुसऱ्या व्यापारी संकुलाच्या गच्चीवर जाऊन दोघे झोपले.
आरोपीच्या प्रेयसीला घेणार ताब्यात
प्रेयसीची छेड काढल्यानेच रागाच्या भरात सोनवणे यांचा खून केल्याची कबुली आरोपी सुनीलने दिली. यावरून घटनास्थळी त्याची प्रेयसी होती. या गुन्ह्यात तिचा सहभाग आहे का, याबाबत तिची कसून चौकशी करण्यासाठी पोलीस तिला ताब्यात घेणार आहेत.