जाधववाडीत शुकशुकाट
By Admin | Published: June 3, 2017 12:46 AM2017-06-03T00:46:21+5:302017-06-03T00:47:52+5:30
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी आज शुक्रवार असल्याने जाधववाडीतील फळभाज्यांच्या अडत बाजाराला साप्ताहिक सुटी होती
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी आज शुक्रवार असल्याने जाधववाडीतील फळभाज्यांच्या अडत बाजाराला साप्ताहिक सुटी होती. धान्याच्या अडत बाजारात मात्र गहू, बाजारी, तांदूळ, तुरीची ५४ टन आवक झाली; पण हमालांनी संपाला पाठिंबा दिल्याने तोलाई झाली नाही. ग्राहकांनीही पाठ फिरविल्याने या बाजारात शुकशुकाट जाणवत होता.
कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेले आहेत. गुरुवारी संपाच्या पहिल्या दिवशी जाधववाडीतील अडत बाजारात टरबूज, टोमॅटो फेकून देणाऱ्या शेतकरी प्रतिनिधींना संतापलेल्या काही व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याने मोठा गदारोळ झाला होता; पण आज अडत बाजाराला सुटी असल्याने परपेठेतून फळे, पालेभाज्या आल्या नाहीत. तिथे २० ते २५ किरकोळ विक्रेत्यांनी कालच्या शिल्लक भाज्या व फळे विक्रीला ठेवली होती. शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी या भागात फेरफटका मारला; पण किरकोळ विक्रेते शिल्लक भाज्या विक्री करताना पाहून ते निघून गेले.
संपाच्या दुसऱ्या दिवशी धान्याच्या अडत बाजारात परपेठेतील आवकीवर मोठा परिणाम झाल्याचे जाणवले. एरव्ही दररोज परपेठेतून १५ ते २० ट्रक धान्य बाजारपेठेत येत असते. मात्र, आज परपेठेतून १६ टन गहू व ३२ टन तांदळाची आवक झाली. गंगापूर, पैठण आदी तालुक्यांतून ३ टन तुरी, आसपासच्या ग्रामीण भागातून १५ पोते गहू व १५ पोते बाजरीची आवक झाली. व्यापाऱ्यांनी सर्वमाल उतरून घेतला व ट्रकचालकांना रवाना केले. या आलेल्या धान्याची तोलाई, हर्राशी झालीच नाही. कारण, शेतकऱ्यांच्या संपाला हमालांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे दुपारपर्यंत हमाल कामावर आले नव्हते. म्हणून तोलाई होऊ शकली नाही, अशी माहिती कृउबाचे सचिव विजय शिरसाठ यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या संपामुळे धान्याच्या अडत बाजारात धान्याची आवक घटली, तसेच वार्षिक धान्य खरेदीही संपुष्टात आल्याने उठावही कमी झाला. यामुळे दिवसभर धान्याचा अडत बाजारात शुकशुकाट जाणवत होता. अनेक अडत्यांनी आज आपली दुकानेही उघडली नव्हती. ज्या अडत्यांनी दुकाने उघडली त्यांनी काम नसल्याने गटागटाने गप्पा मारून वेळ काढला. दुपारी ४ नंतर अडत्यांनी दुकाने बंद करून घरचा रस्ता धरला.