जाफराबाद तालुक्यात चिकुन गुनियाचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:23 PM2017-11-14T23:23:44+5:302017-11-14T23:23:52+5:30
जाफराबाद : तालुक्यात चिकुन गुनिया आजाराने डोके वर काढले आहे. खासगाव, देऊळगाव उगले येथे या आजाराच्या रुग्णांची संख्या अधिक ...
जाफराबाद : तालुक्यात चिकुन गुनिया आजाराने डोके वर काढले आहे. खासगाव, देऊळगाव उगले येथे या आजाराच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत आहे.
काही दिवसांपासून खासगाव आणि देऊळगाव गावात थंडीताप येणे, हातपाय दुखणे, ताप येणे, सर्दी-खोकला इ. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. चिकुन गुनियासदृश हा आजार बरा होण्यासाठी औषधोपचार घेतल्यानंतरही काही दिवसांचा कालावधी लागतो.
ग्रामीण स्वच्छता मोहीम राबविणे सुरू असताना साथीच्या आजाराचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढतच आहे. काही दिवसांपासून तालुक्यातील अनेक गावांमध्ये तापाने ग्रामस्थ फणफणत असताना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाºयांनी गावात जाऊन पाहणीसुध्दा केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाºया रुग्णांना कुठलीच सुविधा मिळत नसल्याने त्यांना नाइलाजास्तव खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. परिणामी गोरगरीब रुग्णांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. या विषयी तालुका आरोग्य अधिकारी सोनटक्के यांना विचारले असता ते म्हणाले की, मी सध्या बैठकीत असून, नंतर माहिती घेऊन सांगतो.