भाविकांनी ओढला जगन्नाथाचा रथ

By Admin | Published: January 17, 2016 11:47 PM2016-01-17T23:47:10+5:302016-01-17T23:56:30+5:30

औरंगाबाद : ‘हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा, कृष्णा हरे हरे... हरे रामा, हरे रामा, रामा, रामा हरे हरे’ असा अखंड महामंत्र जपत शेकडो भाविक जगन्नाथाचा रथ ओढत होते.

Jagannatha chariot caught by devotees | भाविकांनी ओढला जगन्नाथाचा रथ

भाविकांनी ओढला जगन्नाथाचा रथ

googlenewsNext

औरंगाबाद : ‘हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा, कृष्णा हरे हरे... हरे रामा, हरे रामा, रामा, रामा हरे हरे’ असा अखंड महामंत्र जपत शेकडो भाविक जगन्नाथाचा रथ ओढत होते. या रथयात्रेत युवकांची संख्या सर्वाधिक होती. त्यात आयटी क्षेत्रातील युवक अधिक होते.
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) संस्थेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शहरात रविवारी दुपारी जगन्नाथ रथयात्रा भक्तिभावात काढण्यात आली. या रथोत्सवासाठी जगन्नाथ, सुभद्रा व बलराम यांच्या मूर्ती खास ओडिसाहून आणण्यात आल्या होत्या. जगन्नाथाचा खास रथ पंढरपूर येथून आणण्यात आला होता. फुलांच्या सजावटीमध्ये रथात मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. शहागंजमधील चौकात रथ उभा करण्यात आला होता. आधी एकाने रथमार्ग झाडून काढला... झाडूलाही आकर्षकरीत्या सजविण्यात आले होते. नंतर सुरेख रांगोळी काढण्यात आली. दुपारी १२ वाजता शंखनाद करण्यात आला आणि भगवंतांसमोरील पडदा हटविण्यात आला. यानंतर आरती झाली. औरंगाबाद इस्कॉनचे अध्यक्ष डॉ. रोहिणी प्रिया प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखविला आणि रथयात्रेला सुरुवात झाली. रथाच्या दोन्ही बाजूंना दोरखंड लावण्यात आले होते. रथाच्या उजव्या बाजूने महिला, तर डाव्या बाजूने पुरुष भाविक दोरखंड हातात घेऊन रथ ओढत होते. जगन्नाथाचा रथ ओढण्याला मोठे महत्त्व आहे. यामुळेच रस्त्यावरून जाणारे नागरिकही थोडा वेळ तरी रथ ओढत होते. ऋषिकेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली टाळ-मृदंगाच्या तालावर ‘हरे रामा, हरे कृष्णा’ हा महामंत्र अखंडित जपत तल्लीन होऊन युवक नृत्यही करीत होते. भाविक अधूनमधून रथावर पुष्पवृष्टी करीत होते... सराफा रोड, सिटीचौक, मछली खडक, गुलमंडी, गोमटेश मार्केट, पैठणगेट, टिळकपथ, औरंगपुरा, निराला बाजार, नागेश्वरवाडीमार्गे जगन्नाथाचा रथ खडकेश्वर मंदिर मैदानावर जाऊन पोहोचला. रथयात्रेच्या यशस्वीतेसाठी मोहिंदर बखारिया, अ‍ॅड. ओमप्रकाश साबू, राजन नाडकर्णी, प्रकाश राणा, राजेश भारुका, प्रा. युवराज गिरबने, अजित दळवी, श्रीकांत जोगदंड, गणपत कुरुडे, राजेश वर्मा, शेख लाला (नारेगावकर) आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Jagannatha chariot caught by devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.