शौचालयासाठी ४०० लोककलावंतांचा जागर
By Admin | Published: May 29, 2017 12:24 AM2017-05-29T00:24:03+5:302017-05-29T00:25:14+5:30
लातूर : ९० हजार शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट घेऊन काम करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने लोककलावंतांकडून जागर सुरू केला आहे.
आशपाक पठाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. ३१ मार्च २०१८ अखेर जिल्हा हागणदारीमुक्त व्हावा, यासाठी ९० हजार शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट घेऊन काम करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने लोककलावंतांकडून जागर सुरू केला आहे. जवळपास ४०० कलावंत गावोगावी जाऊन शौचालय बांधकामाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करीत आहेत. वासुदेव, मसनजोगी आणि पांगूळही गावोगावी आरोळी ठोकत आहेत.
गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी विडा उचललेल्या काही ग्रामपंचायतींना स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रशासनही पाठबळ देत आहे. जिल्ह्यात एकूण ७८३ ग्रामपंचायती आहेत. यातील ३९० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून, उर्वरित ग्रामपंचायत क्षेत्रात शौचालय बांधकामाची जणू चळवळच उभी करण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांचे मतपरिवर्तन करण्याचे काम हाती घेतले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी १२ हजार रुपयांची शासन मदत देत आहे. ही मदत म्हणजे संबंधित लाभधारकांना प्रोत्साहन असून त्यांचेच आरोग्य सुदृढ राहावे, उघड्यावर कोणीही शौचास जाऊ नये, वैयक्तिक पर्यायाने गावचेही आरोग्य कसे सुरक्षित ठेवता येईल, यासाठी जिल्हा परिषद प्रशासन कामाला लागले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी ग्रामसेवक संघटना तसेच अन्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांंनाही हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी कामाला लावले आहे. त्यानुसार गुडमॉर्निंग पथकेही गावोगावी जात आहेत. उघड्यावर जाणाऱ्या नागरिकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अनोखे स्वागत केले जात आहे. तर काही ठिकाणी थेट पोलीस कारवाईही केली जात आहे. याशिवाय, लोककलावंतही गावोगावी शौचालय बांधकाम, आरोग्य, स्वच्छता याविषयी प्रबोधन करीत आहेत.