तुळजापूर पालिकेच्या उपाध्यक्षपदी जगदाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2017 11:51 PM2017-01-02T23:51:52+5:302017-01-02T23:53:20+5:30
त्ाुळजापूर : येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी पंडितराव जगदाळे यांची निवड करण्यात आली़
त्ाुळजापूर : येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी पंडितराव जगदाळे यांची निवड करण्यात आली़ तर स्वीकृत सदस्य म्हणून पांडुरंग नन्नवरे, अंबरीश जाधव यांची निवड झाली़
येथील नगर परिषदेत सोमवारी उपनगराध्यक्ष, स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष बैठक बोलाविण्यात आली होती़ पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा अर्चना गंगणे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या बैठकीत प्रारंभी उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया झाली़ यात राष्ट्रवादीकडून पंडितराव जगदाळे यांनी तर विरोधी गटातून अपर्णा नाईक यांनी अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या मतदान प्रक्रियेत राष्ट्रवादीचे जगदाळे यांना १४, तर नाईक यांना ६ मते मिळाली. त्यानंतर नगराध्यक्षा गंगणे यांनी पंडितराव जगदाळे यांची बिनविरोध निवड जाहीर केली़ स्विकृत सदस्यपदासाठी राष्ट्रवादीचे गटनेते संतोष परमेश्वर यांनी नारायण नन्नवरे व अंबरीश जाधव यांच्या नावांची शिफारस केली़ तर विरोधकांकडून माजी नगराध्यक्ष बाळासाहेब डोंगरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. या नावांवर संतोष परमेश्वर यांनी आक्षेप घेऊन विरोधकांचा गट बेकायदेशीर असून, त्यांनी फॉरम्याट एक व तीनची पूर्तता केली नसल्याने व तसे अधिकृत डिक्लेरेशन झाले नसल्याने विरोधकांच्या नावांचा विचार करू नये व सत्तारूढ पक्षाच्या दोन्ही नावास मान्यता द्यावी, असा अर्ज दाखल केला. यावर परमेश्वर यांचा आक्षेप मान्य करून पीठासीन अधिकारी अर्चना गंगणे यांनी नारायण नन्नवरे व अंबरीष जाधव यांची स्वीकृत सदस्य म्हणून अधिकृत घोषणा केली. निवडी जाहीर होताच राष्ट्रवादी- शेकाप- रिपाइं कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, कुंकवाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला़ मुख्याधिकारी राजीव बुबणे, कर्मचारी महादेव सोनार, प्रताप कदम यांचे यावेळी सहकार्य लाभले़ (वार्ताहर)