जवान शहीद...फकिराबादवाडी शोकसागरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:02 AM2018-04-13T01:02:05+5:302018-04-13T01:06:07+5:30
शेवटचे संभाषण : माझ्या दोन्ही चिमुकल्यांची काळजी घ्या
वैजापूर : गावचा वीरपुत्र किरण पोपटराव थोरात (३१) यांना वीरमरण आल्याचे कळताच फकिराबादवाडीसह तालुक्यावर शोककळा पसरली. आपल्या लाडक्या भूमिपुत्राच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गुरुवारी सकाळपासूनच फकिराबादवाडीतील थोरात यांच्या शेतवस्तीवर गर्दी केली. शुक्रवारी सकाळी किरण थोरात यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी गावात एक तास ठेवण्यात येणार आहे.
किरण थोरात यांचे शेतवस्तीवर घर असून, तेथे त्यांचे आई-वडील, भाऊ, पत्नी, पाच महिन्यांचा मुलगा श्लोक व मोठी मुलगी श्रेया राहते. किरण यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण लाडगाव (ता. वैजापूर) येथील न्यू हायस्कूलमध्ये तर बारावीपर्यंतचे शिक्षण वैजापूरच्या विनायकराव पाटील महाविद्यालयात झाले होते. २ मार्च २०१३ रोजी येवला तालुक्यातील सायगाव येथील आरती यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर ते सैन्यदलात भरती झाले.
जानेवारीत आले होते घरी
जानेवारी महिन्यात ते पंधरा दिवसांच्या सुट्टीवर घरी आले होते. त्यांना वीरमरण आल्याची धक्कादायक बातमी कळताच संपूर्ण कुटुंब शोकमग्न झाले. किरण यांचा मोठा भाऊ अमोल हा शेती करतो. किरण हेसुद्धा सुटीवर घरी आल्यानंतर शेतीकामात मदत करत असे, असे त्यांच्या कुटुंबियांनी साश्रूनयनांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा सैनिक अधिकारी जाधव, वैजापूरच्या तहसीलदार सुमन मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, वीरगावचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे, जि. प. सदस्य रमेश बोरनारे, पंकज ठोंबरे, बाबासाहेब जगताप, रमेश सावंत आदींनी फकिराबादवाडीत धाव घेऊन थोरात कुटुंबियांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.
एक दिवस आधीच झाले होते बोलणे
किरण थोरात हे आपल्या वडिलांना काका या नावानेच बोलवीत होते. मंगळवारी किरण यांनी मोबाईलवरून आई, वडील व पत्नीला फोन करून घरची खुशाली विचारली होती. तसेच काश्मीरमध्ये परभणीचा जवान शहीद झाल्यापासून सीमेवर तणाव आहे, त्यामुळे मला फोन करण्यास वेळ मिळणार नाही. तसेच माझ्या दोन्ही चिमुकल्यांची काळजी घ्या, असे शेवटचे संभाषण किरण यांनी आपल्या कुटुंबासोबत केले होते.
वडिलांची बुलेटची इच्छा केली पूर्ण
वडिलांना बुलेट गाडी घेऊन देण्याचे किरण थोरात यांचे सैन्यात भरती झाल्यापासून स्वप्न होते, ते स्वप्न त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच सुटीवर आले असताना पूर्ण केले. वडिलांना काहीही न सांगता त्यांना औरंगाबादला नेले. तेथील शोरूममधून नवीन बुलेट गाडी घेऊन ती वडिलांना ‘गिफ्ट’ दिली होती.