जय भद्राच्या जयघोषानी खुलताबादनगरी दुमदुमली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:56 PM2018-03-31T12:56:18+5:302018-03-31T12:56:56+5:30
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी हनुमान जयंती निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे
खुलताबाद (औरंगाबाद) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी हनुमान जयंती निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दर्शनासाठी औरंगाबाद शहर परिसरातून रात्रीच लाखो भाविक चालत आले. पहाटे सहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला.
हनुमान जन्मोत्वानिमित्त औरंगाबाद येथील जयसुख पटेल यांनी भद्रा मारूतीच्या मुर्तीचा शृगांर केला. मुर्तीच्या सजावटीसाठी " श्रीनाथद्वार राजस्थान " चा शृंगार केला.यात हिरे मोती जडीत साज, चमकीचे वस्राने मुर्तीची आकर्षक सजावट केली. हा साज गुजरात मधील अहमदाबाद येथून आणण्यात आला.
रात्रीपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. यात प्रामुख्याने औरंगाबाद येथून पायी येणा-या भाविकांची संख्या मोठी होती. भद्रा हनुमान कि जय म्हणत भाविक दर्शन घेत होते, दिवसभर हनुमान भक्तांनी खुलताबादनगरी दुमदुमली होती.
पहाटे सहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा खा. चंद्रकांत खैरे, आ.अतुल सावे, भद्रा मारूती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पा. बारगळ, सचिव कचरू पा. बारगळ, कार्याध्यक्ष किशोर अग्रवाल, पोपट जैन व विश्वस्थ मंडळाच्या उपस्थितीत झाला.