जय श्रीराम... काका-काकू, हे घ्या अयोध्येचे निमंत्रण..! जायचं बरं का नक्की!
By प्रशांत तेलवाडकर | Published: December 28, 2023 07:26 PM2023-12-28T19:26:25+5:302023-12-28T19:29:01+5:30
शहरातील २२ श्रीराम मंदिरांत आणि त्यासह लहान-मोठ्या सर्व मंदिरांत २२ जानेवारीला आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : १ ते १५ जानेवारीदरम्यान तुमच्या घरासमोर काही स्वयंसेवक येतील... ‘जय श्रीराम, काका-काकू, ही घ्या निमंत्रण पत्रिका... २२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या नूतन बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याला सर्वांना जाणे शक्य नाही. यासाठी त्या दिवशी घराजवळील मंदिराला अयोध्या बनवा व तिथेच सर्वांनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करा... आणि नंतर आपल्याला जमेल तेव्हा श्रीरामलल्लाच्या दर्शनाला सहपरिवार अयोध्येमध्ये यावे...’ असे आवाहन करतील. तेव्हा ते पत्रिका, अयोध्येतील मंदिराचे छायाचित्र व अक्षताही देणार आहेत.
अयोध्येहून आल्या दीड लाख निमंत्रण पत्रिका
श्रीराम जन्मभूमी निर्माणाधीन मंदिर व तिथे बालरूपातील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा यामुळे सर्व रामभक्तांचे लक्ष अयोध्येकडे लागले आहे. याच अयोध्येतून खास दीड लाखावर निमंत्रण पत्रिका शहरात आल्या आहेत. शहरवासीयांना खास अयोध्येहून हे निमंत्रण आले आहे. शहरवासीयांना या पत्रिका १५ दिवसांत पोहोचविण्यात येतील. पत्रिका दोन पानांची असून, एका पानावर विश्वातील रामभक्तांना आवाहन आहे तर दुसऱ्या पानावर अयोध्येतील नवीन मंदिराची माहिती आहे.
घरात पूजेसाठी मंदिराचे मोफत छायाचित्र
पत्रिकेसोबतच अयोध्येतील मंदिराची दीड लाख छायाचित्रेही अयोध्येतून आली आहेत. श्रीरामभक्तांना पत्रिकेसोबतच हे छायाचित्रही मोफत देण्यात येणार आहे. २२ जानेवारीला छायाचित्र देवघरात ठेवून त्याची पूजा करावी, सायंकाळी घरासमोर पणत्या, दिवे लावून दीपोत्सव साजरा करावा, हा ते देण्यामागील हेतू आहे.
पिवळ्या रंगातील ५ क्विंटल अक्षता
शहरातील २२ श्रीराम मंदिरांत आणि त्यासह लहान-मोठ्या सर्व मंदिरांत २२ जानेवारीला आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या धार्मिक उत्सवात सहभागी होण्यासाठी रीतसर अक्षताही देणार आहेत. या अक्षता पिवळ्या रंगातील आहेत. यात तांदळाला हळद, अष्टगंध लावण्यात आले आहे. अशा पिवळ्या रंगातील ५ क्विंटल अक्षता १६ कलशांतून आल्या आहेत.