जायकवाडी धरणात 67 टक्के पाणीसाठा; ३१ हजार क्युसेकने आवक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 09:25 PM2019-08-08T21:25:43+5:302019-08-08T21:25:55+5:30
धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त ६.३३ फूट पाण्याची गरज आहे.
औरंगाबाद : जायकवाडी धरणात आज अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून विसर्ग सुरू असल्याने ३१०३८ क्युसेक्स आवक सुरू होती. सायंकाळी ७ वा धरणाचा जलसाठा ६७.१६ टक्के झाला होता. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त ६.३३ फूट पाण्याची गरज आहे. धरणात आवक कमी झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत आज गेल्या दोन दिवसाच्या मानाने संथगतीने वाढ झाली.
नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर वेअर मधून गोदावरी पात्रात आज २९५९४ क्युसेक व अहमदनगर जिल्ह्यातील ओझर वेअर मधून ९७६९ क्युसेक विसर्ग सुरू होता. हे पाणी जायकवाडी धरणात ३१०३८ क्युसेक क्षमतेने दाखल होत होते.
१५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी सायंकाळी ७ वा १५१५.४७ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा २१९६.२५९दलघमी( ७७.५५ टीएमसी) झाला होता. यापैकी जीवंत जलसाठा १५४८.१५० दलघमी ( ५१.४८ टीएमसी) इतका झाला आहे.
चणकवाडी बंधाऱ्याचे दरवाजे काढण्यास प्रारंभ......
जायकवाडी धरणाचा जलसाठा ७०% च्या आसपास आल्याने नजीकच्या काळात मोठा पाऊस झाला किंवा नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्यास धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. या दृष्टीने पैठण शहरालगत असलेल्या चनकवाडी बंधाऱ्याचे दरवाजे काढून घ्यावे लागतात.
आज कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, आर ई चक्रे, अनिकेत हासबनीस, सुमित भताने आदीच्या पथकाने या बंधाऱ्याचे दरवाजे काढण्याची कार्यवाही सुरू केली. या बंधाऱ्यास एकूण ३८ दरवाजे असून एक दरवाजा काढण्यास साधारणपणे एक ते दीड तासाचा कालावधी लागतो. येत्या दोन दिवसात गेट काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे कार्यकारी अभियंता काळे यांनी सांगितले.