कारागृह अधिका-याचा गोळीबार; महिला बचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:56 AM2017-10-18T00:56:06+5:302017-10-18T00:56:06+5:30
मैत्रीच्या संबंधात एका कारागृह अधिका-यासमवेत राहणा-या महिलेवर अधिका-याने आपल्या रिवॉल्व्हरमधून गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री हडको परिसरात घडली. मात्र सुदैवाने गोळी महिलेला लागली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मैत्रीच्या संबंधात एका कारागृह अधिका-यासमवेत राहणा-या महिलेवर अधिका-याने आपल्या रिवॉल्व्हरमधून गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री हडको परिसरात घडली. मात्र सुदैवाने गोळी महिलेला लागली नाही. ती त्यातून बचावली.
गोळीबार करणा-या या अधिका-याचे नाव किरण संतोष पवार (४०,रा. धुळे, ह.मु. एन-१२ हडको) असून त्याला अटक करण्यात आली आहे.
मैत्रीच्या संबंधात (लिव्ह इन रिलेशनशिप) सुमारे १२ वर्षांपासून या अधिका-याकडे एन- १२ परिसरात ही महिला राहत होती. रविवारी या महिलेने नव-याकडे जाण्याचा आग्रह धरला. या महिलेच्या आग्रहामुळे रागावलेल्या किरण पवारने रिवॉल्व्हरमधून गोळी महिलेच्या दिशेने झाडली. या गोळीबारातून महिला बचावली. नंतर ती महिला सिडकोतील नव-याच्या घराकडे पोहोचली. रविवारी रात्री पवार या महिलेच्या सिडकोतील घराजवळ पोहोचला व त्याने घराची तोडफोड करून धमकी दिली. घाबरलेल्या या महिलेने नंतर नवरा व मुलाबाळांसह सिडको पोलीस ठाण्यात जाऊन याविषयीची तक्रार दिली. प्रकरण गंभीर असल्याने पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी काल रात्री कारवाई करून कारागृह अधिकारी पवार यास अटक केली.
गोळीबार सिटीचौक हद्दीत...
एन- १२ येथील गोळीबाराची घटना सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सिडको पोलिसांनी पवार यास सिटीचौक पोलिसांच्या स्वाधीन केले. सिटीचौक पोलीस ठाण्यात पवारच्या विरोधात हत्या करण्याचा गुन्हा दाखल केला असून, मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात पाठविण्यात आले. हर्सूल कारागृहात अधिका-याच्या रुबाबात राहणारा पवार हा आता इतर कैद्यांसोबत राहत आहे.
पोलिसांनी दिले पत्र...
पवार याची पोलीस कोठडी घेण्यासाठी पोलीस पुनर्विचार करीत असून, न्यायालयात अर्ज करणार असल्याचे समजते. आरोपी पवार याच्याकडून एक सरकारी व एक खाजगी असे दोन रिवॉल्व्हर आणि गोळ्या जप्त करावयाच्या आहेत. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पवार याने झाडलेली गोळी बाथरूमच्या भिंतीतून पंचांसमक्ष जप्त केली
आहे.
नेमका काय आहे प्रकार
रविवारी रात्री सिटीचौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत ३९ वर्षीय महिलेने म्हटले आहे की, ती, तिचा पती व मुलगा सोबत राहतात. ती स्वत: वाळूज येथे एका कंपनीत काम करते. मुलगी दुस-या राज्यात अभियंता म्हणून नोकरीवर आहे. मुलगा कॉलेजला शिकतो. वर्ष २००८ ला ही महिला एका आरोपीला भेटण्यासाठी जेलमध्ये गेली होती. त्यावेळी तिची ओळख आरोपी पवार सोबत झाली होती.
ही ओळख मैत्रीत बदलली त्यामुळे गेली चार वर्षे ते एकमेकांच्या संपर्कात होते. २०१२ मध्ये महिला मुलाच्या शिक्षणासाठी पुण्यात राहण्यास गेली तेव्हा तिला भेटण्यासाठी पवार पुण्यातही जात होता. तिथे तिला घरेलू गोष्टीवरून पवार ब्लॅकमेल करीत होता. अखेर ही महिला जानेवारी २०१७ मध्ये नवºयाला काही न सांगता एका भाड्याच्या घरात पवार याच्यासोबत राहू लागली. तेव्हापासून ते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये होते. या महिलेने नव-याकडे जाण्याचा प्रयत्न केला की पवार तिच्यासोबत भांडणे करीत होता. या महिलेची मुलगी रविवारी घरी येणार असल्याने तिला नव-याकडे जायचे होते. त्यावरून तिचे पवार याच्यासोबत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणातच आरोपी पवार याने भरलेली रिव्हॉल्व्हर महिलेच्या दिशेने रोखून गोळी झाडली. या गोळीबारात ती बचावली. यानंतर पवारने महिलेला बेदम मारहाणही केली.