किर्तीस्तंभ वेरुळ लेण्यासमोरच राहील; भागवत कराडांचे सकल जैन समाजाला आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 04:16 PM2022-02-19T16:16:57+5:302022-02-19T16:19:11+5:30
वेरुळ लेण्यांसमोरील किर्तीस्तंभ हटवू नये, या मागणीचे निवेदन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा व सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले.
औरंगाबाद : सर्व जगाला ‘जिओ और जिनो दो’ हा अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या २५००व्या निर्वाण महोत्सवानिमित्त वेरुळ लेण्यासमोर ( Ellora Caves ) किर्तीस्तंभ ( Jain Kirtistanbha ) उभारण्यात आला आहे. यापुढेही हा स्तंभ त्याच ठिकाणी राहील. स्तंभ हटविण्यात येणार नाही, असे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat karad ) यांनी शहरातील सकल जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
पुरातत्व विभागाने वेरुळ लेण्याजवळील किर्तीस्तंभ हटवण्याचे पत्र जैन समाजाला दिले होते. त्यामुळे जैन समाजात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची सकल जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी भेट झाली. यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा ( Rajendra Darda ) यांनी डॉ. कराड यांचे स्वागत केले. यावेळी राजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, भगवान महावीर यांच्या २५०० निर्वाण महोत्सवानिमित्त सरकारने तीन ठिकाणी किर्तीस्तंभ उभारले. यापैकी एक औरंगाबादेत, दुसरा कन्नडमध्ये, तर तिसरा वेरुळ लेण्यासमोरील जागेत आहे. सकल जैन समाजाने नव्हे, तर शासनाने किर्तीस्तंभ उभारला होता. मात्र, हा स्तंभ हटविण्यासाठी पुरातत्व विभागाने अहवाल दिला आहे. हा अहवाल समाजात तेढ निर्माण करणारा आहे. हा किर्तीस्तंभ व पहाड मंदिर जिथे आहे तिथेच राहावे, यासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करावेत, असे त्यांनी निवेदन केले.
यानंतर सकल जैन समाजाच्यावतीने डॉ. कराड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. कराड यांनी सांगितले की, किर्तीस्तंभ जैन समाजाचाच नव्हे, तर सर्व समाजाचा आहे. यासंदर्भात २३ फेब्रुवारी रोजी दिल्लीत पुरातत्व विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. त्यानंतर केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांना भेटून यासंदर्भात ‘जैसे थे’ आदेश काढण्यात येतील. त्यांच्या आश्वासनाचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. यावेळी कर्नाटक येथील माजी आ. संजय पाटील, माजी महापौर बापू घडामोडे, माजी नगरसेवक राजू शिंदे, तसेच समाजाचे उपाध्यक्ष डी. बी. कासलीवाल, ललित पाटणी, विलास साहुजी, महावीर ठोेले, प्रमोद कासलीवाल, देवेंद्र काला, माणिक गंगवाल, जी. एम. बोथरा, महावीर सेठी, आनंद सेठी, विनोद लोहाडे, हर्षवर्धन जैन, दिनेश गंगवाल, शैलेश पाटणी, संजय पापडीवाल, प्रवीण लोहाडे, डॉ. प्रेमचंद पाटणी, मनोज बोरा आदींची उपस्थिती होती.
आश्वासनाने आनंद झाला
वेरुळ लेण्यासमोरील किर्तीस्तंभ हटवि्ण्यात येणार नाही. तिथेच राहील व यासाठी पुढील आठवड्यात केंद्रीयस्तर व पाठपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिल्याने आनंद झाला.
- वर्धमान पांडे, अध्यक्ष, पार्श्वनाथ ब्रह्माचर्याश्रम जैन गुरुकुल, वेरुळ.