जैन तत्त्वज्ञान संशोधन केंद्र
By Admin | Published: July 15, 2015 12:26 AM2015-07-15T00:26:31+5:302015-07-15T00:41:14+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे कचनेर (ता. औरंगाबाद) जैन तत्त्वज्ञान संशोधन केंद्र सुरूकरण्यात येत असून,
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे कचनेर (ता. औरंगाबाद) जैन तत्त्वज्ञान संशोधन केंद्र सुरूकरण्यात येत असून, येत्या रविवारी (१९ जुलै) या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. जैन तत्त्वज्ञानाचा संशोधनपर अभ्यास करण्यासाठी मराठवाड्यातील हे पहिलेच केंद्र असून, यासाठी श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेरच्या ट्रस्टची मोठी मदत झाली आहे.
शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या प्रसिद्ध श्री अतिशय क्षेत्र कचनेर हे केवळ जैन धर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक स्थळ तर आहेच; परंतु या परिसरात विविध, सामाजिक उपक्रमही चालतात. त्यामुळे या ठिकाणाचे औरंगाबाद जिल्ह्यात मोठे महत्त्व आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या या संशोधन केंद्रासाठी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील निवृत्त प्राध्यापक तसेच जैन तत्त्वज्ञानाचेही अभ्यासक असणारे डॉ. प्रकाश पापडीवाल यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाने नेमलेल्या समितीने या कचनेर येथे जाऊन या केंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची पडताळणी केली. विद्यापीठाच्या बृहत आराखड्याप्रमाणे कचनेर येथे जैन तत्त्वज्ञान केंद्र स्थापन करण्याबाबत विद्यापीठाच्या विद्या परिषदेने आधीच मान्यता दिलेली आहे.
डॉ. पापडीवाल यांनी सांगितले की, या केंद्रासाठी आधीच्या एका इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून, तेथे विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्यासाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
कचनेरच्या अतिशय क्षेत्रात जैन तत्त्वज्ञानासंबंधी मोठी ग्रंथसंपदा असून ती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. या परिसराच्या आसपास असणाऱ्या काही जैन क्षेत्रामध्ये दुर्मिळ हस्तलिखिते आहेत. ती संशोधन कार्यासाठी उपलब्ध करवून देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न होतील. विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र विद्याशाखेच्या अंतर्गत हे केंद्र राहणार आहे. या केंद्रात संशोधनासाठी विद्यापीठच विद्यार्थी देणार आहे.
केंद्रातर्फे आर्थिक भार आणि सुविधा पुरविण्याचे काम करण्यात आले आहे. या केंद्रामुळे जैन तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारे नवे दालन अभ्यासकांना उपलब्ध होणार आहे.
या केंद्राचे १९ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते होणार आहे.
४ यावेळी विक्रीकर सहआयुक्त सुमेरकुमार काळे आणि विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. व्ही. बी. खंदारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी डॉ. एम. एम. देसरडा, डॉ. एच. जे. नरके, डॉ. डी. आर. खैरनार यांचीही उपस्थिती राहणार आहे.
सुरुवातीला आठ विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रवेश
४ विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय कचनेरमध्येच केली जाणार
४ एम. फिल आणि पीएच. डी. पदवीसाठी संशोधन
४ पीएच. डी. साठी विद्यापीठाची ‘पेट’ उत्तीर्ण व्हावी लागणार
४ आंतरराष्ट्रीय सेमिनार, परिषदा होणार