जयसिंगराव गायकवाडानीही बांधले बाशिंग; भाजपमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 12:02 PM2020-11-06T12:02:33+5:302020-11-06T12:05:19+5:30
माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांची सध्या घोंघावते मराठा वादळ आपणास पुन्हा यश देईल, अशी आशा पल्लवित झाली आहे.
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपत स्पर्धा वाढली असून, अर्ज घेण्याच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी भाजपच्या इच्छुकांनी सहा उमेदवारी अर्ज घेतले. माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांची सध्या घोंघावते मराठा वादळ आपणास पुन्हा यश देईल, अशी आशा पल्लवित झाली आहे. त्यांनी चार उमेदवारी अर्ज घेत इच्छुकांच्या रांगेत नंबर लावला आहे.
विभागीय आयुक्तालयातील सहायक निवडणूक अधिकारी विभागातून गुरुवारी दिवसभरात २२ उमेदवारांनी ५० अर्ज नेले. यामध्ये भाजपसाठी ६, वंचित बहुजन आघाडीकडून ४, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांच्यासाठी ४ उमेदवारी अर्ज नेण्यात आले. ८ अर्ज अपक्ष व अन्य पक्षांनी नेले आहेत. विद्यमान आ. सतीश चव्हाण, भाजपचे शिरीष बोराळकर यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज घेतला. बीड जिल्ह्यातून तीन इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज घेतले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी अर्ज नेण्यात आला. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून चव्हाण यांनी अर्ज घेतल्याची नोंद निवडणूक अधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे.
भाजपमध्ये बोराळकर, किशोर शितोळे, माजी मंत्री गायकवाड, प्रवीण घुगे यांच्यासह दोन अन्य नावे चर्चेत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गटाचा ओढा शिरीष बोराळकर यांच्याकडे, तर शितोळे यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, आ. हरिभाऊ बागडे प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून खेचायचा असेल, तर मराठा कार्ड खेळण्याचा विचारही भाजपत सुरू आहे. त्यामुळे गायकवाड यांनी मैदानात उडी घेतल्याची चर्चा आहे. शितोळे यांनी मात्र अजून अर्ज घेतलेला नाही. उमेदवारी अर्ज नेण्याचा आकडा पाहता २२ उमेदवार तरी सध्या निवडणूक मैदानात येण्यास इच्छुक असल्याचे दिसते.
भाजपचा उमेदवार कोण ? आज जाहीर होण्याची शक्यता
भाजपचा उमेदवार कोण असेल, हे शुक्रवारी दिवसभरात ठरेल, अशी शक्यता आहे. पक्षाच्या गोटातून बोराळकर यांचे नाव आघाडीवर आहे. माजी खा. गायकवाड यांनी सांगितले, मी दोन वेळा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. माझी उमेदवारी नक्कीच जाहीर होईल. गुरुवारी उमेदवारी जाहीर होणार होती; परंतु निवड समितीने शुक्रवारी उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. गायकवाड यांनी १६ वर्षांपूर्वी या मतदारसंघाचे दोनदा नेतृत्व केले आहे.