‘त्या’ जवानावर बाभूळगावात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:38 AM2018-05-28T00:38:59+5:302018-05-28T00:39:36+5:30

घातपाताची शक्यता : जबलपुरात बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

 'Jaiwala' is performed in Babulgaon funeral | ‘त्या’ जवानावर बाभूळगावात अंत्यसंस्कार

‘त्या’ जवानावर बाभूळगावात अंत्यसंस्कार

googlenewsNext

वैजापूर : जबलपूर रेल्वेस्थानकातून १७ मे रोजी बेपत्ता झालेल्या तालुक्यातील बाभूळगाव बु. येथील जवानाचा मृतदेह जबलपूरपासून बारा कि.मी. अंतरावर रांझी येथे सापडल्याने खळबळ उडाली असून यात घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी (दि.२७) या जवानावर त्यांच्या मूळगावी बाभुळगाव बु. येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नवनाथ गजानन चोपडे असे या मृत जवानाचे नाव आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांना जबर धक्का बसला असून आज गावात एकही चूल पेटली नाही.
वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव बु. येथील नवनाथ गजानन चोपडे यांची पोस्टींग आसाम राज्यातील न्यू मिसामारी लांबा कॅम्प युनिट ६२६ येथे होती. पंधरा दिवसांची सुट्टी घेऊन ते पत्नी, एक मुलगा व एक मुलगी यांना घेऊन आसाम राज्यातील रंगिया रेल्वेस्थानकावरुन १५ मे रोजी गुवाहाटी -मुंबई एक्स्प्रेसने घरी येण्यासाठी निघाले होते. १७ मे रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर स्थानकावर रेल्वे थांबल्यानंतर नवनाथ पाणी आणण्यासाठी खाली उतरले. पण परत आले नाही. त्यांच्या पत्नीने शोधाशोध केली. पण तोपर्यंत रेल्वेने स्थानक सोडले होते. पत्नी मंगल या दोन मुलांना घेऊन घरी आल्या व त्यांनी घडलेली आपबिती कुटुंबियांना सांगितली. दोन दिवस वाट बघितल्यानंतरही नवनाथ परत आले नाहीत म्हणून त्यांच्या सहकाºयांनी जबलपूर गाठले व तेथील रेल्वे पोलिसात नवनाथ हरविल्याची तक्रार दिली. पण नवनाथ यांचा तपास लागत नव्हता. पण या प्रकाराचा उलगडा जबलपूर येथील सैन्यदलाच्या कार्यालयात झाला. या कार्यालयात चोपडे यांचे कुटुंबिय चौकशीसाठी गेले असता त्यांनी नवनाथ यांच्या फोटोची मागणी केली. तेथील रेंजरने हा फोटो काही दिवसांपूर्वी व्हाट्स अ‍ॅप ग्रुपवरुन व्हायरल झाल्याची माहिती देत ताबडतोब पोलिसांशी संपर्क करण्यास सांगितले. जबलपूर पोलिस ठाण्याशी संपर्क केला असता त्यांनी रांझी पोलिसांना १८ मे रोजी अज्ञात इसमाचा मृतदेह मिळाल्याचे सांगितले. रांझी पोलिसांनी १९ मे रोजी शवविच्छेदन करुन २० मे रोजी दफनविधी केला होता. फोटोची ओळख पटल्यानंतर तेथील उपविभागीय अधिकाºयांच्या परवानगीने सहा दिवसांनंतर मृतदेह बहेर काढून पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गणेश चोपडे, रवी चोपडे, माजी सरपंच अण्णा गायकवाड व बद्रीनाथ चोपडे यांनी रविवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास पार्थिव बाभुळगाव बु. येथे आणले. त्यावेळी आई, वडील, पत्नी, लहान भाऊ, नऊ वर्षांचा मुलगा अनिकेत व अकरा वर्षांची मुलगी प्रियंकासह ग्रामस्थांच्या भावना अनावर झाल्या. मृतदेह बघताच सर्वांनी हंबरडा फोडला. त्यांचा मुलगा अनिकेत याने पार्थिवाला अग्निडाग दिला. याप्रसंगी आ. भाऊसाहेब चिकटगावकर, रमेश पाटील बोरनारे, अभय पाटील चिकटगावकर आदींसह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अश्रूंचा बांध फुटला
जवान नवनाथ चोपडे यांचे पार्थिव बघून बाभूळगावात अश्रूंचा बांध फुटला. दहा दिवसांपासून चिंताग्रस्त असलेल्या येथील ग्रामस्थांनी या जवानाला साश्रू नयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला. लष्कराच्या सलामीबरोबर हजारोंच्या समुदायाने ‘नवनाथ भाऊ अमर रहे’ अशा घोषणा देताच बाभूळगाव गहिवरून गेले. सहा महिन्यानंतर नवनाथ चोपडे सैन्य दलातून सेवानिवृत होणार होते. पंधरा दिवसांपूर्वीच त्याने आपल्या आईला फोन करुन मी पंधरा दिवसांसाठी गावाकडे येत आहे, असे सांगितले होते, मात्र प्रवासा दरम्यान घडलेल्या घडामोडीनंतर नवनाथचा मृतदेहच गावात आला. आपल्या पोटच्या मुलाचा मृतदेह पाहताच त्याच्या आई-वडिलांनी हंबरडाच फोडला. सकाळपासून बाभूळगावकडे वाहनांची रिघ लागली होती. जो-तो मिळेल त्या वाहनाने बाभूळगावात येत होता. रस्त्यासह शेतातील पाऊलवाटाही गर्दीने ओसंडून गेल्या होत्या.

 

Web Title:  'Jaiwala' is performed in Babulgaon funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.