जळकीबाजार-खुपटा रस्ता बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:04 AM2021-03-10T04:04:17+5:302021-03-10T04:04:17+5:30

सिल्लोड : मराठवाडा व विदर्भातील चार गावांना जोडणारा जळकीबाजार-खुपटा रस्ता, भोकरदन तालुक्यातील दहिगाव, हिसोडा हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला ...

The Jalaki Bazaar-Khupta road became a death trap | जळकीबाजार-खुपटा रस्ता बनला मृत्यूचा सापळा

जळकीबाजार-खुपटा रस्ता बनला मृत्यूचा सापळा

googlenewsNext

सिल्लोड : मराठवाडा व विदर्भातील चार गावांना जोडणारा जळकीबाजार-खुपटा रस्ता, भोकरदन तालुक्यातील दहिगाव, हिसोडा हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून, जागोजागी हा रस्ता उखडल्याने दररोज या रस्त्यावर अपघात सत्र सुरूच आहे, तर या खराब झालेल्या पाच किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल अर्धा तास लागत आहे. तत्काळ याची दुरुस्ती करण्यात यावी, नसता नागरिक आंदोलन करतील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

मराठवाडा व विदर्भातील नागरिकांना रहदारी करण्यासाठी जळकीबाजार ते खुपटा हा रस्ता भोकरदन तालुक्यातील दहिगाव, हिसोडा व सिल्लोड तालुक्यातील जळकीबाजार-खुपटा हा दळणवळणासाठी जवळचा मार्ग आहे. तसेच विदर्भ, खान्देशाला जोडणारा रस्ता आहे. या पाच किलोमीटर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील राजराजेश्वर मंदिरानंतर राज्यातले दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर शिवतीर्थ जळकीबाजार येथे बांधण्यात आले आहे. या ठिकाणी होत असलेल्या विविध कार्यक्रमांमुळे शिवतीर्थ जळकीबाजाराचे नाव अवघ्या राज्यात झाले आहे.

सिल्लोड तालुक्यातील जगविख्यात अजिंठा लेणीच्या कुशीत असलेल्या जळकीबाजाराची नवीन ओळख निर्माण झाली असली, तरी उखडलेल्या रस्त्यांमुळे नागरिक व शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे जडवाहने कलंडून मोठा अपघात होत आहे.

अलीकडेच सलग दोन दिवस या मार्गावर दोन वेगवेगळे अपघात घडले आहेत. त्यामुळे वाहने चालविताना वाहनधारकांना जीव मुठीत घ्यावा लागत आहे.

अकरा वर्षांत एकदाही दुरुस्ती नाही...

पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून २०१० साली खुपटा ते जळकीबाजार रस्त्याच्या कामासाठी अंदाजित ८७ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यातून ६ लाख रुपये प्रतिवर्षी दुरुस्तीवर खर्च करायचे होते. मात्र, तब्बल अकरा वर्षांत एकदाही या रस्त्याची दुरुस्ती केली नाही.

- पंडित दांडगे, मंदिर समितीचे पदाधिकारी.

दोन्ही मंत्र्यांना साकडे

भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे व सेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार या दोन मातब्बर नेत्यांचा हा मतदारसंघ आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता दुरुस्तीसाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई व सिल्लोड तालुक्यातील शिवना बाजारपेठेशी जोडणारा हा सोपा मार्ग आहे. या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून द्यावी; अन्यथा जळकीबाजारसह हिसोडा, खुपटा, दहिगाव येथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.

- प्रदीप जगताप, जळकीबाजार.

फोटो : जळकीबाजारच्या खराब रस्त्यामुळे एक ॲपेरिक्षा उलटल्याचे दिसत आहे.

Web Title: The Jalaki Bazaar-Khupta road became a death trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.