साताऱ्यात जलकुंभाचे काम संथ गतीने, ‘पाणी मिळणार कधी’?
By साहेबराव हिवराळे | Published: September 8, 2023 04:54 PM2023-09-08T16:54:35+5:302023-09-08T16:54:49+5:30
एक दिवस एक वसाहत: साताऱ्यात रस्त्याचे नो टेन्शन, इतर समस्यांचे कसे होणार सोल्युशन!
छत्रपती संभाजीनगर : सातारा जलकुंभाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. यामुळे सातारावासियांना पाणी कधीपासून मिळणार, हा प्रश्न आहे. याशिवाय परिसरातील रस्त्यांचे बारा वाजले असून, खड्डेमय रस्ते आहेत. इतर समस्याही आवासून उभ्या असून, त्यावर तोडगा कधी काढला जाणार, याकडे सातारावासीय डोळे लावून आहेत.
समस्या कोणत्या ?
जलवाहिनीच नाही यामुळे नळ उपलब्ध नाही
रस्ते खड्डेमय; साफसफाई नाही
ड्रेनेज लाइनचे काम अपूृर्ण; काही ठिकाणी फुटलेले
नालेसफाईदेखील नाही
कचरा व्यवस्थापन नाहीच; यामुळे दुर्गंधी
कोण आहेत वास्तव्यास?.
सातारा परिसरात वस्ती प्रचंड वाढली असून, या भागात शिक्षकवृंद, पोलिस अधिकारी, कर्मचारी, आयटीआय तसेच बडे व्यावसायिकही वास्तव्यास आहेत
निवडणुकीपूर्वी तरी नळाला पाणी येईल का?
जलकुंभाच्या बांधकामाची गती मंदावलेली असल्याने किमान लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी तरी नळाला पाणी येईल की नाही, या विवंचनेत नागरिक आहेत.
- भारती भांडेकर
उद्यान विकसित करा...
या परिसरात २२ वर्षांपासून आम्ही राहतो. टॅक्सही देतो. मात्र, कोणतेच प्रश्न प्रामुख्याने सोडविले जात नाहीत. बालउद्यान विकसित करण्यासाठी मनपाने आश्वासन दिले; परंतु ते अद्याप विकसित केलेले नाही.
- योगिता बेंडसुरे
एकही माणूस कामावर दिसत नाही
३० ऑक्टोबर २०२१ला जलकुंभाच्या कामाचे उद्घाटन झाले, हळूहळू जलकुंभाचे काम सुरू आहे. त्याच्या चढणाऱ्या कॉलमला पाहून चला बुवा, आता परिसरात मुबलक पाणी मिळेल, असे वाटले होते. परंतु, या टाकीच्या कामाला गती मिळाली नाही, नेमकं कुठे काम अडत आहे हेच कळत नाही.
- दीपक सूर्यवंशी
बोअरवेलशिवाय कोणतीच सुविधा नाही...
सूर्यदीपनगरात बोअरवेलशिवाय कोणतीच सुविधा नाही. बोरवेलचे पाणी दरवर्षी जानेवारीमध्ये आटते. यंदा तर पावसाळ्यातच सप्टेंबरमध्ये तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न आहे तर झाडे, प्राणी कसे जगतील, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. बोअरवेलला पाण्याच्या फिल्टरचा खर्च करावा लागतो. अन्यथा जारच्या पाण्यावरच तहान भागवावी लागते.
- निर्मला म्हस्के पाटील