अखेर जालना पालिकेला मिळाले लेखाधिकारी...!
By Admin | Published: February 17, 2016 12:08 AM2016-02-17T00:08:30+5:302016-02-17T00:32:32+5:30
गंगाराम आढाव , जालना नगर पालिकेत मागील काही वर्षांपासून रिक्त असलेले म्हत्वाचे लेखाधिकारीपद अखेर शासनाने भरले खरे. मात्र, १५ दिवसांपूर्वी रूजू झालेल्या
गंगाराम आढाव , जालना
नगर पालिकेत मागील काही वर्षांपासून रिक्त असलेले म्हत्वाचे लेखाधिकारीपद अखेर शासनाने भरले खरे. मात्र, १५ दिवसांपूर्वी रूजू झालेल्या अधिकाऱ्यांकडे अद्याप पालिकेने अधिकृतरित्या पदभारच दिला नसल्याने नव्याने नियुक्त झालेले लेखाधिकारी जी. आर. चिकटे यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच ठाण मांडले आहे.
जालना नगर पालिका ही अ वर्ग पालिका आहे. या पालिकेतील लेखा विभागाचा पदभार पालिकेतील अन्य विभागातील अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येत होता. सध्या उपमुख्याधिकारी क़ का. मुदखेडकर यांच्याकडे या पदाचा प्रभारी पदभार आहे.
यापदावर जिल्हा कोषागार कार्यालयातील अप्पर कोषागार अधिकारी जी. आर. चिकटे यांची २९ जानेवारी रोजी जालना नगर पालिकेत लेखाधिकारीपदी बदली करण्यात आली. त्यानुसार त्यांनी २ फेबु्रवारी रोजी बदलीच्या ठिकाणी म्हणजे जालना पालिकेत रूजू झाले आहेत. विशेष म्हणजे रूजू होवून त्यांना १५ दिवसांचा कालावधी झालेला असतानाही अद्यापपर्यंत पालिकेने त्यांना अधिकृतपणे पदभार सोपविला नाही.
त्यांना लेखाधिकारी म्हणून स्वतंत्र अशी कॅबीनही देण्यात आलेली नाही. एका दिवसापुरती पाणीपुरवठा सभापतींची कॅबीनमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांना ती कॅबीन सोडण्यास भाग पाडण्यात आले. त्यामुळे ते थेट मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्या कॅबीनमध्येच आपले बस्तान मांडून आहेत. पुजारी यांच्या खुर्चीच्या शेजारीच खूर्ची लावून ते दिवसभर कार्यालयीन वेळेत तेथेच बसतात. दरम्यान नगर पालिका प्रशासनात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याची चर्चा
आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून नगर पालिकेचे स्वतंत्र असे लेखा परिक्षणही झाले नसल्याची चर्चा आहे. आता स्वतंत्र अधिकाऱ्यांची शासनाने नेमणूक केल्याने पालिकेतील अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखा परिक्षणाची भीती वाटत आहे. नगर पालिका प्रशासनाकडून लेखाधिकाऱ्यास पदभार देण्यास टाळाटाळ होत असल्याची चर्चा आहे. लेखाधिकारी मिळाल्याने या अधिकाऱ्यांची अन्य अधिकाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.