जिल्हा पाणंदमुक्तीच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:26 AM2017-09-30T00:26:10+5:302017-09-30T00:26:10+5:30
जिल्ह्यात स्वच्छता अभियानाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे.
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्याचा कार्यक्रम मिशन मोडवर राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७७६ पैकी ७७६ गावांमध्ये स्वच्छतागृह बांधण्याचे काम पूर्ण झाले असून, आॅनलाइन फोटो अपलोडिंगचे काम ६५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात स्वच्छता अभियानाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यात २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार दोन लाख ६६ हजार ९५२ कुटुंबांपैकी एक लाख ८० हजार ८५ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे समोर आले. त्यामुळे शौचायले बांधण्याचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेची संपूर्ण यंत्रणा गत काही महिन्यांपासून ग्र्रामीण भागात काम करत आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्यासह जिल्हा परिषदेतील वर्ग एक, वर्ग दोन, वर्ग तीनच्या अधिकाºयांना तालुकानिहाय जबाबदाºयांचे वाटप करण्यात आले. आवश्यक तिथे ग्रामपंचायती दत्तक देऊन अधिकाºयांकडून स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण करून घेण्यात आले. स्वच्छतागृह बांधकामाच्या प्रगतीचा दररोज राज्य, विभागस्तरावरून आढावा घेण्यात आला. तसेच स्वच्छतागृहांचे बांधकाम व वापराबाबत जनजागृती करण्यासाठी गावनिहाय ग्रामसभा घेणे, गृह भेटी देणे, स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या वापर करावयास सांगणे, गावातील शाळा, अंगणवाड्या येथे स्वच्छतागृहांचे बांधकाम करणे, खराब शौचालयांची दुरुस्ती ही कामे वरिष्ठ अधिकाºयांनी अनेकदा गावात मुक्कामी थांबून युद्ध पातळीवर पूर्ण करून घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील दोन लाख चाळीस हजारांपेक्षा अधिक कुटुंबांनी वैयक्तिक शौचालये बांधली आहेत. परतूर, जाफराबाद, मंठा आणि बदनापूर तालुका संपूर्ण पाणंदमुक्त झाली असून, आॅनलाइन फोटो अपलोडिंगचे कामही पूर्ण झाले आहे. तर भोकरदन, अंबड, घनसावंगी, जालना या तालुक्यांमधील स्वच्छतागृह बांधकामचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. या तालुक्यात पूर्ण झालेल्या स्वच्छतागृहांचे आॅनलाइन फोटा अॅलोडिंगचे कामे अंतीम टप्प्यात आहे.
पुढील दोन दिवसात हे काम पूर्ण होईल, असे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पी.पी. कोकणी यांनी सांगितले. त्यामुळे येत्या दोन आॅक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त होणाºया विशेष कार्यक्रमात जिल्हा १०० टक्के पाणंदमुक्त घोषित होण्याची शक्यता आहे.