जालनारोड सहापदरी होणार; पाऊणशे कोटींतच कामे करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 07:48 PM2019-02-22T19:48:22+5:302019-02-22T19:49:47+5:30
आता रोड सहापदरी करणे आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम यातून करण्यात येणार आहे.
औरंगाबाद : जालनारोडचे काम ४०० कोटींहून २४५ कोटींत करा, नंतर ते १०४ कोटींमध्येच करण्याचे आदेश देण्यात आले आणि आता ७६ कोटींतच ते काम गुंडाळा, असा निर्णय केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने घेतल्यामुळे त्या प्रकल्पात तिसऱ्यांदा सुधारणा करून ३० ते ४० कोटींची दांडी मारली. आता रोड सहापदरी करणे आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम यातून करण्यात येणार आहे.
लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे गुरुवारी दिशा समितीच्या बैठकीत चर्चा झाली. समितीचे अध्यक्ष खा.चंद्रकांत खैरे यांनी नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांना याप्रकरणी माहिती विचारली. बीड बायपासचे काम एनएचएआयच्या अंतर्गत येण्यात शासकीय अडथळा निर्माण झाल्याचे सांगून बीड बायपासचा ३८९ कोटींचा प्रकल्पच रद्द करण्यात आला आहे. जालना रोडचे काम ७६ कोटींतच होणार आहे.
खा.खैरे म्हणाले, जालनारोडचे नेमके काम कसे होणार आहे. लोकमतमध्ये बातमी वाचल्यानंतर समजले की, ४० कोटींपर्यंत अनुदान एनएचएआयने कमी केले आहे. दिल्लीतील बैठकीत रोडचे काम करणार असल्याचे सांगितले जाते, त्यानंतर पुढे काही होत नाही. वेळोवेळी बैठका, पत्रव्यवहार केला, पार्लमेंटरी समितीसमोर मुद्दा आला, पण तरीही काही होत नाही. अकोला, मूर्तिजापूर, अमरावती, नाशिकमधील कामे एनएचएआयच्या अखत्यारीत नसताना केली, मग औरंगाबादला सापत्न वागणूक का दिली जाते. यावर संचालक गाडेकर म्हणाले, निर्णय का होत नाही, हे सांगणे अवघड आहे. जालनारोडचे रुंदीकरण होणार नाही. तसेच त्यावर बीटी सरफेसचे काम एनएचएआय करणार नाही. पेव्हर ब्लॉकसह एकेक पदर दोन्ही बाजूंनी वाढविण्यात येईल. रोडची लेव्हल एकच असेल, सहापदरी रोड होईल. दौलताबाद येथील गेटजवळील वळण रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.
जालनारोडच्या कामाचा प्रवास असा...
डिसेंबर २०१५ मध्ये जालना रोड आणि बीड बायपाससाठी ७८९ कोटी रुपयांची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानंतर जून २०१८ मध्ये गडकरी यांनी दोन्ही प्रकल्पांसाठी २४५ कोटींची घोषणा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रपरिषदेत केली. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १०४ कोटींतून जालनारोडचे काम करण्याचा अंतिम निर्णय झाल्यानंतर आता जानेवारीत ७६ कोटींतूनच काम करण्याच्या सूचना आहेत.
जालनारोडसाठी आजवरच्या घोषणा
डिसेंबर २०१५ ४०० कोटी
जून २०१८ २४५ कोटी
डिसेंबर २०१८ १०४ कोटी
जानेवारी २०१९ ७६ कोटी