जालना-उस्मानपूर रेल्वे विद्युतीकरण पूर्ण; वेगात सुधारणा, अधिक गाड्या सुरू होण्याची शक्यता

By सुमित डोळे | Published: November 4, 2023 12:52 PM2023-11-04T12:52:10+5:302023-11-04T12:53:45+5:30

गाड्यांच्या सरासरी वेगात सुधारणा होऊन विभागात आणखी गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात.

Jalana-Usmanpur railway electrification complete; Improvement in speed, possibility of starting more trains | जालना-उस्मानपूर रेल्वे विद्युतीकरण पूर्ण; वेगात सुधारणा, अधिक गाड्या सुरू होण्याची शक्यता

जालना-उस्मानपूर रेल्वे विद्युतीकरण पूर्ण; वेगात सुधारणा, अधिक गाड्या सुरू होण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : डिझेल इंजिनवरून रेल्वे आता इलेक्ट्रिक इंजिनवर येण्याच्या प्रक्रियेने आता वेग धरला असून, जालना-उस्मानपूरदरम्यान ५३ किलोमीटरचे रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे या विभागात एकूण २२७ किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून उस्मानपूर, परभणी, मुदखेड, धर्माबाददरम्यानच्या विभागांमध्ये लवकरच विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या संपूर्ण रेल्वेमार्ग वीज तारांनी जोडला जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी रेल्वेचे स्वतंत्र वीज उपकेंद्रही उभारले जात असून, डिसेंबर २०२३ पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष देण्यात आले आहे. या कामाचे चार टप्पे असून, पहिल्या टप्प्यात उस्मानपूर ते परभणी, परभणी ते पूर्णा, पूर्णा ते नांदेड आणि नांदेड ते मुदखेड या चार टप्प्यांत कामे सुरू आहेत. आतापर्यंत अकोला ते पूर्णा, पिंपळकुटी ते मुदखेड, परळी ते परभणी, अंकाई ते जालना, जालना ते उस्मानपूरदरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. मनमाड, मुदखेड, ढोणे विद्युतीकरण प्रकल्पाला २०१५-२़१६ मध्ये ७८३ किलोमीटर अंतरासाठी अंदाजे ८६५ कोटी रुपये खर्चाची मंजुरी देण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील प्रकल्पाची लांबी मनमाड, धर्माबाददरम्यान अंदाजे ४२० किमी रेल्वे ट्रॅकचा समावेश आहे.

फायदा काय?
रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण ट्रॅक्शन पॉवरमधील बदल टाळून आणि कोचिंग आणि मालवाहू गाड्यांच्या मार्गातील खोळंबा कमी करून रेल्वेची अखंड हालचाल सुरू राहते. परिणामी, गाड्यांच्या सरासरी वेगात सुधारणा होऊन विभागात गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात. या प्रक्रियेमुळे शून्य कार्बन उत्सर्जन होते; तसेच इंधनाच्या खर्चातही बचत होते.

Web Title: Jalana-Usmanpur railway electrification complete; Improvement in speed, possibility of starting more trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.