ऊस प्रश्नांवर जलसमाधी आंदोलन; पोलिसांची तटबंदी भेदून आंदोलकांच्या गोदावरी पात्रात उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 06:19 PM2021-10-05T18:19:20+5:302021-10-05T18:23:30+5:30

ऊस प्रश्नावर जनशक्ती संघटनेच्या जलसमाधी आंदोलनाने पोलिसांची मोठी धावपळ 

Jalasamadhi movement on sugarcane issues; protesters jump in Godavari basin of Paithan | ऊस प्रश्नांवर जलसमाधी आंदोलन; पोलिसांची तटबंदी भेदून आंदोलकांच्या गोदावरी पात्रात उड्या

ऊस प्रश्नांवर जलसमाधी आंदोलन; पोलिसांची तटबंदी भेदून आंदोलकांच्या गोदावरी पात्रात उड्या

googlenewsNext
ठळक मुद्देआत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ९ जणांवर गुन्हा दाखल

पैठण : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ( Sugarcane Producer Farmers ) मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दुपारी जनशक्ती संघटनेच्या चार कार्यकर्त्यांनी पोलिसांची तटबंदी भेदून गोदावरीच्या वाहत्या पात्रात जलसमाधी ( Protesters Jump in Godavari river on sugarcane issue ) घेण्यासाठी उड्या मारल्या. घाटावर तैनात पोलीस व नगर परिषदेच्या पथकाने तत्काळ नदीत उड्या घेत चारही जणांना पाण्याबाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान या आंदोलनामुळे गोदावरी परिसरात मात्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जनशक्ती संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून पैठण शहरातील गोदावरी काठावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरीक्षक किशोर पवार, सपोनी उषा सांगळे, रामकृष्ण सागडे, सतीश भोसले, फौजदार गटकूल आदी अधिकारी घाटावर उपस्थित होते.उसाची (एफ आर पी)  एक रक्कमी मिळावी, उसाला तीनहजार पन्नास रुपये भाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पैठण येथील गोदावरी नदीच्या काठावर मंगळवारी आक्रमक जलसमाधी आंदोलन केले. आंदोलकांना आवरता आवरता पोलिसांच्या नाकी नऊ आले. या प्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून पैठण पोलिसांनी ९ आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

जलसमाधी घेण्यासाठी गोदावरी पात्रात उड्या मारलेल्या आंदोलकांना बाहेर काढल्या नंतर संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे, यांच्या नेतृत्वाखाली घाटावरच  ठिय्या अंदोलन  करण्यात आले. पोलिसांनी आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू करताच सहा आंदोलकांनी एकमेकास  मिठी मारुन पोलीसांच्या कारवाईस विरोध केला. अथक प्रयत्न करूनही पोलीसांना ही मीठी सैल करता आली नाही. 

शेवटी पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी साखर आयुक्त व आंदोलकात  मध्यस्थी केली. साखर  प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात सोलापूर येथून आलेले जनशक्ती शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे, रऊफ पटेल, बाबुराव मोरे, हारुणभाई बागवान, बंडु बोबडे, शेख नसीर, शेख शब्बीर,याच्यासह शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांचा सहभाग होता.

Web Title: Jalasamadhi movement on sugarcane issues; protesters jump in Godavari basin of Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.