जळगाव रस्त्याचा एस. टी. प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:35 PM2019-07-03T23:35:08+5:302019-07-03T23:35:56+5:30

जळगाव ते औरंगाबाद या चौपदरी रस्त्याचे काम बंद पडले आहे. याचा सर्वाधिक फटका एस. टी. महामंडळाला आणि प्रवाशांना बसतो आहे. खड्डेमय आणि चिखलमय रस्त्यामुळे बसचा वेग मंदावला आहे. त्यामुळे प्रवासाचा कालावधी वाढला असून, विलंबासह आदळआपटीच्या यातना प्रवाशांना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवास टाळला जात असल्याने ‘एस. टी.’च्या उत्पन्नातही घट झाली आहे.

Jalgaon Road S. T. Passengers hit | जळगाव रस्त्याचा एस. टी. प्रवाशांना फटका

जळगाव रस्त्याचा एस. टी. प्रवाशांना फटका

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवासाचा वेळ वाढला : खड्ड्यांमुळे बसचे पाटे-स्प्रिंग तुटण्याचे प्रकार, प्रवासी घटल्याने ‘एस.टी.’च्या उत्पन्नातही घट


औरंगाबाद : जळगाव ते औरंगाबाद या चौपदरी रस्त्याचे काम बंद पडले आहे. याचा सर्वाधिक फटका एस. टी. महामंडळाला आणि प्रवाशांना बसतो आहे. खड्डेमय आणि चिखलमय रस्त्यामुळे बसचा वेग मंदावला आहे. त्यामुळे प्रवासाचा कालावधी वाढला असून, विलंबासह आदळआपटीच्या यातना प्रवाशांना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवास टाळला जात असल्याने ‘एस. टी.’च्या उत्पन्नातही घट झाली आहे.
‘गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एस. टी.’ असे वाक्य सत्यात उतरविण्यासाठी गावागावांपर्यंत एस. टी. पोहोचविण्याचा प्रयत्न एस. टी. महामंडळाकडून केला जातो. परंतु खराब रस्त्यांमुळे अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ एस. टी. महामंडळावर येत आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून जळगाव, अजिंठा मार्गावर बसगाड्या धावतात. औरंगाबाद-सिल्लोड शटल बससेवा चालविण्यात येते. शिवाय सोयगाव आणि सिल्लोड आगाराच्या बसही धावतात. आजघडीला जळगाव - औरंगाबाद रस्त्यावर एस. टी. चालविणे अशक्य होत आहे.
खड्डेमय रस्त्यामुळे बसगाड्यांचा वेग मंदावला आहे. कमी वेगामुळे प्रवासाचा कालावधी वाढला आहे. त्यामुळे प्रवासी वैतागत आहेत. बस वेगात चालविल्यास खड्ड्यांमुळे बसचे पाटे-स्प्रिंग तुटण्याचे प्रकार होत आहेत. त्याबरोबर टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढत आहे. खराब रस्त्यामुळे बससेवा वेळेच्या आत कशी द्यावी, असा प्रश्न एस. टी. महामंडळासमोर उभा राहिला आहे. खड्डे, चिखलमय रस्त्यांचा मनस्ताप सहन करण्यापेक्षा प्रवास पुढे ढकलण्याकडे प्रवाशांचा कल आहे.
असा वाढला प्रवासाचा वेळ
जवळपास १७० कि. मी. अंतर असलेल्या औरंगाबाद-जळगाव मार्गावरून पूर्वी एस. टी. ४ तासांत जळगावला पोहोचत होती. परंतु आता याच प्रवासासाठी तब्बल ६ ते ६.३० तास लागत आहेत. सिल्लोडला दीड तासाऐवजी अडीच ते तीन तास लागत आहेत. तर अजिंठ्याला जाण्यासाठी अडीच तासांऐवजी चार ते पाच तास जात असल्याचे ‘एस. टी.’च्या सूत्रांनी सांगितले.
‘कि. मी.’ मागे दोन रुपयांनी उत्पन्न घटले
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ‘एस. टी.’च्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. विशेषत: सोयगाव आणि सिल्लोड आगाराला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे प्रति कि.मी.मागे दोन रुपयांनी उत्पन्नात घट झाल्याची माहिती एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महिनाभरात अवघे २६२ पर्यटक
एस. टी. महामंडळातर्फे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी जाणाºया पर्यटकांसाठी वातानुकूलित पर्यटन बस चालविण्यात येते. खराब रस्त्यामुळे या बसच्या पर्यटकांच्या संख्येवरही परिणाम झाला आहे. बसची आसनक्षमता ४२ असताना गेल्या महिनाभरात अवघ्या २६२ पर्यटकांनी बसमधून प्रवास केला. २८ जून रोजी पर्यटक नसल्यामुळे ही बस रद्दही झाली होती.
रस्त्याचा परिणाम
जळगाव रस्त्याच्या परिस्थितीमुळे बसच्या वेळेवर परिणाम होत आहे. शिवाय प्रवासी संख्याही कमी झाली आहे. त्यातून दीड ते दोन रुपयांनी प्रति कि. मी. मागे उत्पन्न कमी झाले आहे. शिवाय बसचे स्प्रिंग-पाटे तुटण्याचे प्रकार होत आहेत.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एस. टी. महामंडळ

Web Title: Jalgaon Road S. T. Passengers hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.