विधानसभेच्या औरंगाबादमधील तिन्ही जागा लढण्याचा जलील यांचा दावा चुकीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 02:30 PM2019-08-10T14:30:48+5:302019-08-10T14:32:21+5:30
कोणी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, याबाबतचा अंतिम निर्णय बाळासाहेबच घेतील.
औरंगाबाद : ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतून त्यांच्या पक्षाचे उमेदवार निवडणूक लढविणार, असा केलेला दावा अत्यंत चुकीचा आहे. ‘एमआयएम’ हा वंचित बहुजन आघाडीचा मित्रपक्ष आहे आणि आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. कोणी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची, याबाबतचा अंतिम निर्णय बाळासाहेबच घेतील. त्यामुळे असा दावा करणे चुकीचे आहे, असे आघाडीचे नेते मुकुंद सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर हे औरंगाबादेत होते. शहरातील विविध कार्यकर्ते, नेत्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर दुपारी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम व औरंगाबाद मध्य विधानसभा या तिन्ही मतदारसंघांतून ‘एमआयएम’ निवडणूक लढविणार असून, वंचित बहुजन आघाडीने त्या जागा सोडाव्यात, असे आवाहन केले. त्यांच्या या विधानासंबंधी शहरात प्रामुख्याने आघाडीचे पदाधिकारी, आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
प्रातिनिधिक स्वरुपात मुकुंद सोनवणे यांनी सांगितले की, एकीकडे बहुजन आघाडीकडे ‘एमआयएम’ने ८० जागांचा प्रस्ताव दिल्याचे खासदार जलील सांगतात. त्यानंतर शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांची निवडणूक ‘एमआयएम’ लढणार, असेही तेच म्हणतात. शेवटी वंचित बहुजन आघाडीचे नेते हे अॅड. बाळासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे ते निर्णय घेतील, कोणी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची ते. ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष खासदार जलील यांनी आघाडीकडे ८० जागांचा प्रस्ताव दिलेला असला, तरी त्यांना १० किंवा त्यापेक्षाही कमी जागा मिळतील. त्यामुळे त्यांनी बिनबुडाचे दावे करू नयेत. शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघ त्यांना सुटेल. त्यानंतर जिल्ह्यातील उर्वरित सर्व विधानसभा मतदारसंघांतून वंचित बहुजन आघाडीने निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. दरम्यान एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीतील विधानसभेसाठी इच्छुक असणाºया कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी चालविली आहे. वंचित बहुजन आघाडीला औरंगाबाद मध्यची जागा हवी आहे. शिवाय राखीव मतदारसंघ असलेल्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघावरही वंचित आघाडी दावा करु शकते, असे चित्र आहे.
राज्यात ‘एमआयएम’च्या अस्तित्वाबद्दल शंका
खासदार जलील यांच्या वक्तव्यावर शहरातील वंचित आघाडीच्या एका बड्या नेत्याने अतिशय तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, वंचित आघाडी म्हणजे केवळ दलित- मुस्लिमांची आघाडी नाही. कधीही विचारपूर्वक भूमिका व्यक्त केली पाहिजे. ४‘एमआयएम’ने गेल्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत २४ ठिकाणी निवडणूक लढविली. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात जलील यांना आंबेडकरी पक्ष- संघटनांच्या मतदारांनी भरभरून मतदान केले. त्यामुळे ते निवडून आले. ४याही वेळी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना केवळ बाळासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून समाजाने एकगठ्ठा मतदान केले आणि ते निवडून आले. मात्र, मुस्लिम समाजाने औरंगाबाद वगळता अन्य लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलेले नाही. त्यामुळे राज्यात ‘एमआयएम’चे अस्तित्व आहे की नाही, हीच शंका आहे.