पाणीटंचाईवर जलजीवन मिशनचा उतारा चालेना; सध्या ३० लिटरच पाणी घ्या, ५५ लिटरचे पुढे बघू!

By विजय सरवदे | Published: September 6, 2023 01:57 PM2023-09-06T13:57:35+5:302023-09-06T13:58:22+5:30

मागील दोन दशकांमध्ये औरंगाबादसह मराठवाड्यातील जिल्ह्यांत सतत दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे घटती भूजल पातळी हा या भागातील सर्वात जास्त चिंतेचा विषय आहे.

Jaljeevan Mission's solution to water scarcity does not work; Take only 30 liters of water for now; Let's look forward to 55 liters! | पाणीटंचाईवर जलजीवन मिशनचा उतारा चालेना; सध्या ३० लिटरच पाणी घ्या, ५५ लिटरचे पुढे बघू!

पाणीटंचाईवर जलजीवन मिशनचा उतारा चालेना; सध्या ३० लिटरच पाणी घ्या, ५५ लिटरचे पुढे बघू!

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील १२४१ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. यापैकी ६८२ गावांत नळाद्वारे पाणीपुरवठाही सुरू करण्यात आला; पण निकषानुसार दरडोई ५५ लिटर पाणी देण्याऐवजी टंचाईचे कारण पुढे करत सध्या दरडोई ३० लिटर एवढाच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे बाराही महिने मुबलक पाणीपुरवठा करण्याचा जलजीवन मिशनचा भ्रमाचा भोपळा सलामीलाच फुटला आहे. दरम्यान, मिशनची तसेच वॉटर ग्रिडची सर्व कामे पूर्ण झाल्यास तसेच चांगला पाऊस झाल्यास जलजीवन मिशनअंतर्गत नागरिकांना दरडोई ५५ लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल, असे अधिकारी सांगतात.

मागील दोन दशकांमध्ये औरंगाबादसह मराठवाड्यातील जिल्ह्यांत सतत दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे घटती भूजल पातळी हा या भागातील सर्वात जास्त चिंतेचा विषय आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे ‘विहिरीतच नाही, तर पोहोऱ्यात कुठून येईल,’ अशी परिस्थिती या जिल्ह्याची झाली आहे. तरीही जलजीवन मिशनने ग्रामीण भागातील बाराही महिने टंचाईग्रस्त गाव, वाड्या, तांड्यांना मुबलक शुद्ध पाणीपुरवठ्याचा दावा करत तब्बल ६७७ कोटींच्या ११६१ योजना सुरू केल्या आहेत. यापैकी काही तालुक्यांत योजना पूर्णत्वाकडे आल्या असून, जिल्ह्यातील ६८२ गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पण, नदी, नाले, तलाव कोरडी पडल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे या मिशन अंतर्गत दरडोई ५५ लिटर शुद्ध पाणीपुरवठ्याचा हेतू साध्य होताना तूर्तास तरी दिसत नाही.

पावणेपाच घरांना नळाचे पाणी
या मिशनचे काम पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर अखेरपासून जिल्ह्यातील ४ लाख ८७ हजार ९११ घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत ७६ टक्के घरापर्यंत नळजोडणी झालेली असली तरी उर्वरित कामे प्रगतिपथावर असल्यामुळे अनेक घरांना पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही.

७ कोटी गेले; १९ कोटी आले
मार्चअखेरपर्यंत प्राप्त ७ कोटी अखर्चित निधी राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाने गेल्या आठवड्यात परत घेतला. असे असले तरी नुकताच १९ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी सांगितले.

Web Title: Jaljeevan Mission's solution to water scarcity does not work; Take only 30 liters of water for now; Let's look forward to 55 liters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.