जालन्यात आमदार, माजी मंत्री येणार आमने-सामने

By Admin | Published: August 27, 2014 01:01 AM2014-08-27T01:01:54+5:302014-08-27T01:01:54+5:30

संजय कुलकर्णी , जालना विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. जालना विधानसभा मतदार संघात शिवसेना व काँग्रेस या दोन पक्षांत निवडणुकीत सामना रंगणार असला

Jalna MLAs, former ministers will come face-to-face | जालन्यात आमदार, माजी मंत्री येणार आमने-सामने

जालन्यात आमदार, माजी मंत्री येणार आमने-सामने

googlenewsNext



संजय कुलकर्णी , जालना
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. जालना विधानसभा मतदार संघात शिवसेना व काँग्रेस या दोन पक्षांत निवडणुकीत सामना रंगणार असला तरी बसपा, भारिप आणि मनसे उमेदवारांचाही त्यात महत्वाचा सहभाग राहिल, अशी चिन्हे आहेत. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल व माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात लढतीचे चित्र राहिल, अशी शक्यता आहे.
हा मतदारसंघ मागील पंधरा वर्षांपूर्वी शिवसेना-भाजपा युतीचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र मागील निवडणुकीत काँग्रेसतर्फे कैलास गोरंट्याल विजयी झाले. त्यानंतर गेल्या अडीच वर्षापूर्वी जालना नगरपालिका व पंचायत समितीही काँग्रेस आघाडीच्या ताब्यात आली. तीन-चार महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या लाटेने जालना विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवेंना मताधिक्य मिळाले. वास्तविक गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना मताधिक्य मिळाले होते. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे आ. गोरंट्याल यांनी जनतेसमोर आपल्या कार्याचा लेखाजोखा सादर करण्याची तयारी दर्शविली आहे. पक्षातून अन्य इच्छुकांची नावेही समोर येत आहेत. १९ आॅगस्ट रोजी काँग्रेसच्या राज्य निवड समितीसमोर आ. गोरंट्याल यांच्यासह माजी आ. शकुंतला शर्मा, डॉ. संजय लाखे पाटील, प्रा. सत्संग मुंढे यांनीही मुलाखती दिल्या. या सर्वांनी आपल्या कार्याचा आढावा पक्षश्रेष्ठींसमोर सादर केला. निवड समिती ठरवेल, त्याच नावावर उमेदवारीचे शिक्कामोर्तब होईल. तरीही गोरंट्याल यांची उमेदवारी सद्यस्थितीत पक्की मानली जात आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा प्रतिस्पर्धी पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिले जाते. मागील निवडणुकीत घनसावंगी मतदारसंघातून पालकमंत्री राजेश टोपेंना तुल्यबळ लढत दिलेले माजी मंत्री अर्जुन खोतकर पुन्हा आपल्या जुन्या मतदारसंघाकडे वळलेले आहेत. मोर्चा, धरणे, आंदोलनांच्या माध्यमातून काही दिवसांमध्ये खोतकर यांनी शक्तीप्रदर्शन दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवसेनेतून भास्कर अंबेकर, विष्णू पाचफुले हेही इच्छूक आहेत. शेवटी पक्षाचा निर्णयच अंतिम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रशीद पहेलवान यांनी बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला. तेही बसपाकडून नशीब आजमावणार असल्याने निवडणुकीला चांगलाच रंग भरणार आहे. दुसरीकडे मनसेकडून रवी राऊत यांनीही उमेदवारीसाठी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे हेही पक्षाकडून इच्छूक आहेत. गोरंट्याल यांनी जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या पूर्णत्वासाठी सत्ताधाऱ्यांसमोरच आपली ताकद पणाला लावली. शहरातील अनेक भागात तयार झालेले रस्ते, महिला व बाल रुग्णालयाच्या नूतन इमारत व अंतर्गत जलवाहिनीसाठी मिळवावयाचा निधी यासाठीही प्रयत्न केले. तर जायकवाडी पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तत्कालीन शिवसेना नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांच्या कार्यकाळात तयार होऊन शासनाकडे सादर झाला. अर्जुन खोतकर यांनी न्यायालयात दाद मागितल्याने योजनेसाठीचा पहिला हप्ता मिळाला, अशा दावे-प्रतिदाव्यांनी गाजलेली जायकवाडी पाणीपुरवठा योजना आगामी काळात पुन्हा चर्चेत राहणार यात शंका नाही.

Web Title: Jalna MLAs, former ministers will come face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.