जालना पोलीसची कम्बाईन बँकर्सवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:53 AM2019-01-28T00:53:16+5:302019-01-28T00:53:42+5:30
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरूअसलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या टी २0 क्रिकेट स्पर्धेत जालना पोलीस संघाने चुरशीच्या लढतीत बलाढ्य कम्बाईन बँकर्स संघांवर २ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. अन्य लढतीत जिल्हा परिषदेने एलआयसी संघावर ८८ धावांनी दणदणीत मात केली. आज झालेल्या सामन्यात शेख अहमद आणि अब्दुल वहीद हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.
औरंगाबाद : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरूअसलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या टी २0 क्रिकेट स्पर्धेत जालना पोलीस संघाने चुरशीच्या लढतीत बलाढ्य कम्बाईन बँकर्स संघांवर २ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. अन्य लढतीत जिल्हा परिषदेने एलआयसी संघावर ८८ धावांनी दणदणीत मात केली. आज झालेल्या सामन्यात शेख अहमद आणि अब्दुल वहीद हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.
कम्बाईन बँकर्सने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ५ बाद १६५ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून शैलीदार फलंदाज मिलिंद पाटीलने ३७ चेंडूत ६ चौकारांसह ४८, राजेश कीर्तिकरने २१ चेंडूंत एक षटकार व ६ चौकारांसह ३९ धावा फटकावल्या. अमय उनकुलेने २७ व निखिल मुरुमकरने नाबाद १९ धावांचे योगदान दिले. जालना पोलीसकडून निरंजन चव्हाण व सतीश एस. यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जालना पोलीस संघाने विजयी लक्ष्य १८.४ षटकांत ८ गडी गमावून १६८ धावा करीत गाठले. त्यांच्याकडून शेख अहमद याने २९ चेंडूंत २ षटकार व ४ चौकारांसह ४१, एम. राठोड याने १६ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २९ निरंजन चव्हाणने १३ चेंडूंतच २ षटकार व एका चौकारासह २१, प्रल्हाद बकले याने १७ व बाळू बादुरे याने १२ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह नाबाद १८ धावा केल्या. कम्बाईन बँकर्सकडून इनायत अलीने १६ धावांत ३, राजेश कीर्तीकरने २ व मिलिंद पाटील व महेंद्रसिंग कानसा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
तत्पूर्वी, सकाळच्या लढतीत जिल्हा परिषदने २0 षटकांत ५ बाद २0५ धावांचा डोंगर रचला. त्यांच्याकडून अब्दुल वहीदने ४३ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह २७, अजय भंडारी याने २१ चेंडूंत ५ चौकार, एका षटकारासह नाबाद ४१ व अरुण अल्हड याने २७ धावांचे योगदान दिले. आरीफ सय्यदने १६ धावा केल्या. प्रत्युत्तरात एलआयसी सं २0 षटकांत ७ बाद १२२ धावापर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून महेश रेड्डीने ३ चौकारांसह नाबाद ३0, विल्यम लालसरेने १४ धावा केल्या. जिल्हा परिषदकडून प्रदीप राठोडने २८ धावांत ३ गडी बाद केले.