जालना रोड १०४ कोटींतून करा; बीड बायपासचे काम रद्द होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 04:55 PM2018-12-31T16:55:48+5:302018-12-31T16:55:58+5:30
डिसेंबर २०१५ मध्ये गाजावाजा करून जालना रोड आणि बीड बायपाससाठी ७८९ कोटी रुपयांची घोषणा केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केली.
औरंगाबाद : जालना रोडचे काम १०४ कोटींमध्ये करण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ४०० कोटींहून १०४ कोटींतच तो रस्ता आता करावा लागणार आहे. बीड बायपासचे काम एनएचएआयच्या अंतर्गत येण्यात शासकीय अडथळा निर्माण झाल्याचे सांगून ते काम आता रद्द झाल्यात जमा आहे.
डिसेंबर २०१५ मध्ये गाजावाजा करून जालना रोड आणि बीड बायपाससाठी ७८९ कोटी रुपयांची घोषणा केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केली. आता हे दोन्ही प्रकल्प गुंडाळण्यात आल्याचे जमा आहे. जून २०१८ मध्ये गडकरी यांनी २४५ कोटींची घोषणा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रपरिषदेत केली. मात्र, गेल्या आठवड्यात १०४ कोटींतून जालना रोडचे काम करण्याचा अंतिम निर्णय झाला आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये जालना रोड आणि बीड बायपासचा डीपीआर एनएचएआयच्या मुख्यालयास तत्कालीन प्रकल्प अधिकारी यू.जे. चामरगोरे यांनी सादर केला होता. त्यांनी केलेल्या डीपीआरवर कुठलीही अंमलबजावणी मुख्यालयाने केली नाही. परिणामी, डीपीआरमध्ये दोन्ही प्रकल्पांसाठी तरतूद केलेले उड्डाणपूल कागदावरच राहणार हे स्पष्ट आहे. बीड बायपास हा मृत्यूमार्ग असून, त्याचे कामही एनएचएआय करणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
शिवाजीनगर, देवळाईचौकाचे काय
शिवाजीनगर येथील रेल्वेक्रोसिंगवर पूल बांधणे, देवळाई चौकात पॅनल उड्डाणपूल बांधण्यात येईल, अशी माहिती एनएचएआयने वारंवार जाहीर केली. डीपीआरमध्ये जालना रोड आणि बीड बायपासवर किती व कुठे पूल बांधण्यात येणार, त्याचे डिझाईन तयार करण्यात आले; परंतु आता हे सगळे कागदावरच राहिले आहे. बीड बायपासच्या हस्तांतरणावरून शासकीय राजकारण रंगले आहे. त्यामुळे तो रस्ता एनएचएआय विकसित करण्याच्या ‘मूड’मध्ये नाही. जालना रोडचे काम १०४ कोटींत होणार असल्यामुळे डीपीआरमधील सर्व तरतुदी रद्द करण्यात आल्यात जमा आहेत. बीड बायपास अजून किती दिवस ‘डेंजर वे’ म्हणून नागरिकांच्या नशिबी राहील, हे सांगता येत नाही.
घोषणेपुरतेच आले हे दोन्ही प्रकल्प :
जालना रोड आणि बीड बायपास हे दोन्ही प्रकल्प घोषणेपुरतेच ठरले आहेत.
- जालना रोडची एकूण लांबी १४ कि़ मी. आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ७८९ कोटी होती. सहापदरीमध्ये सर्व्हिस रोड, सायकल ट्रॅक, फुटपाथसह ४५ ते ६० मीटर डीपी रोडचा समावेश होता. तीन उड्डाणपूल, ६ भुयारी मार्ग, दोन रेल्वे उड्डाणपुलांचा मूळ डीपीआर होता. २०१७ मध्ये जालना रोडवरील उड्डाणपुलांची संख्या ५ वरून ३ केली. मुकुंदवाडी आणि चिकलठाणा उड्डाणपूल रद्द करण्यात आले. जालना रोडवरील भुयारी मार्गांची कामे रद्द झाली.
३० डिसेंबर रोजी काय झाले
३० डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाडा विभागाची आयुक्तालयात बैठक घेतली. यामध्ये जालना रोड आणि बीड बायपासबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी विचारणा केली. मात्र गडकरी यांनी याबाबत काही स्पष्टीकरण दिले नाही. आ.अतुल सावे यांनी सांगितले, बीड बायपासला भविष्यात नॅशनल हायवेमध्ये घेऊ. त्यासाठी डीपीआर करण्यासाठी गडकरी यांनी सुचित केले आहे. जालना रोडसाठी १०४ कोटी रुपयांतून डांबरीकरण करण्याबाबत मान्यता दिली आहे.
हा खर्च वाया जाणार
जालना रोडचे डांबरीकरणाचे काम १३ कोटींतून सध्या करण्यात आले आहे. या कामानंतर किमान ३ वर्षे तरी दुसरे काम करणे शक्य नाही, असे असताना केम्ब्रिज ते नगरनाक्यापर्यंतचा जालना रोड १०४ कोटींतून डांबरीकरणासह करण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आल्याने त्याची अंमलबजावणी तातडीने झाल्यास १३ कोटींचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे.
जालना रोडवर काय होते
- ४०० कोटींचा डीपीआर
- ५ उड्डाणपूल, २ भुयारी मार्ग
- महावीर चौक, आकाशवाणी, चिकलठाणा, विमानतळ आणि केम्ब्रिज शाळेजवळ उड्डाणपूल प्रस्तावित होते. रामनगर, अमरप्रीत चौक येथे भुयारी मार्ग बांधण्यात येणार होते. सहा पदरी रुंदीकरणासह सायकल ट्रॅक व फुटपाथही होणार होते.
बीड बायपासचा डीपीआर असा
बीड बायपासची एकूण लांबी १४ कि़ मी. आहे. बीड बायपासवर एमआयटी, संग्रामनगर, देवळाई चौकात उड्डाणपूल प्रस्तावित होते.बीड बायपासवरील झाल्टा फाटा, शिवाजीनगर उड्डाणपूल २०१७ मध्ये रद्द केला. प्रकल्पांची घोषणा २५ डिसेंबर २०१५; एकूण अंदाजित खर्च ७८९ कोटी
बीड बायपासवर काय होते
एकूण डीपीआर ३८९ कोटी
तीन उड्डाणपुलांचा समावेश; सहा पदरी रुंदीकरणासह फुटपाथ
सुधारित घोषणा -१ जून २०१८; अंदाजित खर्च २४५ कोटी
अंतिम घोषणा - २७ डिसेंबर २०१८; फक्त जालना रोडसाठी १०४ कोटी. यात फक्त डांबरीकरण होणार