जालना रोड, बीड बायपास एनएचएआयच्या अखत्यारीत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:59 AM2017-11-27T00:59:02+5:302017-11-27T00:59:08+5:30

जालना रोड, बीड बायपास या रोडचे तीन वर्षांपूर्वी हस्तांतरण करून घेतले तरी ते दोन्ही रोड आपल्या अखत्यारीत येत नाहीत, असे स्पष्टीकरण नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी दिले आहे.

 Jalna Road, Beed Bypass is not owned by NHAI | जालना रोड, बीड बायपास एनएचएआयच्या अखत्यारीत नाही

जालना रोड, बीड बायपास एनएचएआयच्या अखत्यारीत नाही

googlenewsNext

विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जालना रोड, बीड बायपास या रोडचे तीन वर्षांपूर्वी हस्तांतरण करून घेतले तरी ते दोन्ही रोड आपल्या अखत्यारीत येत नाहीत, असे स्पष्टीकरण नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी दिले आहे. जर रस्ते अखत्यारीत येत नव्हते तर डीपीआर, रुंदीकरणात येणा-या मालमत्तांचे सर्वेक्षण, मोजणी कशाच्या आधारे केली हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
जालना रोडवर २०१४-१५ या वर्षात करण्यात आलेल्या सव्वादोन कोटींच्या खर्चानंतर काहीही खर्च झालेला नाही. त्यामुळे रोड पूर्णत: खड्ड्यात गेलेला आहे. तशीच अवस्था बीड बायपासची आहे. एनएचएआय जालना रोडचे काम करणार म्हणून महापालिकेनेदेखील क्रांतीचौक ते महावीर चौक या सव्वासहा कोटींच्या निविदा २०१५ साली मंजूर होऊनही काम करून घेतलेले नाही. परिणामी मनपा, पीडब्ल्यूडी आणि एनएचएआय या त्रिकुटांमध्ये अडकलेले हे दोन्ही महत्त्वाचे
रस्ते अधांतरी असून,
सामान्य औरंगाबादकरांसोबत
लपंडाव सुरू आहे. दरम्यान, पीडब्ल्यूडीच्या वरिष्ठ सूत्रांनी रस्ता एनएचएआयकडे हस्तांतरित केल्याचे सांगितले.
केंद्राच्या परवानगीनंतर निविदा
प्रकल्प संचालक गाडेकर यांनी कळविले आहे की, शहरातील प्रस्तावित नगरनाका ते केम्ब्रिज स्कूल, बीड बायपास या रस्त्यांकरिता एनएचएआयचा प्रस्ताव ३१ मार्च २०१७ रोजी पाठविला आहे. हे दोन्ही रस्ते कार्यालयाच्या अखत्यारीत येत नाहीत. त्यामुळे त्या रस्त्यांची डागडुजी एनएचएआयकडे येत नाही. एनएचडीपीत त्या रस्त्यांचा समावेश नाही. त्यासाठी केंद्र सरकारच्या वित्त विभागाची पूर्व परवानगी आवश्यक आहे.
एनएचएआयच्या मुख्यालयातून परवानगी आल्यानंतर निविदा प्रक्रियेचे काम करण्यात येईल. अद्याप हे प्रकल्प रद्द करण्यात आलेले
नाहीत.
या लपंडावामुळे असा बसला फटका
एनएचएआयने जालना रोड व बीड बायपासचे काम करण्याबाबतची घोषणा २०१५ मध्ये केली. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. ही घोषणा होताच पीडब्ल्यूडी आणि मनपाने रस्त्यावर खर्च करणे बंद करून टाकले. एनएचएआय काम करणार म्हणून मनपाने क्रांतीचौक ते महावीर चौक या रस्त्यासाठी आलेला निधी आजपर्यंत तसाच पडून ठेवला.
मनपाने त्या रस्त्याकडे २०१५ पासून आजपर्यंत दुर्लक्ष केले. परंतु एनएचएआयकडे जालना रोड आणि बीड बायपासचे काम केव्हा सुरू करणार याबाबत विचारणा केली नाही. बीड बायपासची तीच अवस्था झाली आहे. देवळाईपर्यंत रस्ता मनपा हद्दीत आहे. मनपा महानुभाव आश्रम ते देवळाई चौकापर्यंतच्या रस्त्याबाबत काहीही नियोजन करीत नाही.
हे दोन्ही रस्ते अलीकडच्या काळातील वाढत्या वाहतुकीमुळे अपघाती होत आहेत. सामान्य नागरिकांच्या जिवावर हा सगळा प्रकार बेतत आहे. कागदी घोडे नाचविण्यात मग्न असलेल्या मनपा, पीडब्ल्यूडी, एनएचएआयमुळे सामान्यांना त्याची किंमत मोजावी लागत आहे.

Web Title:  Jalna Road, Beed Bypass is not owned by NHAI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.