जालना रोडचे रूपडे बदलणारे डिझाईन तयार
By Admin | Published: June 20, 2017 12:06 AM2017-06-20T00:06:23+5:302017-06-20T00:07:01+5:30
औरंगाबाद : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) ४०० कोटी रुपयांतून होणाऱ्या जालना रोड रुंदीकरणाचे रूपडे बदलणारे ‘थ्रीडी’ डिझाईन तयार केले
विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) ४०० कोटी रुपयांतून होणाऱ्या जालना रोड रुंदीकरणाचे रूपडे बदलणारे ‘थ्रीडी’ डिझाईन तयार केले असून, त्याचे वरिष्ठ पातळीवर सादरीकरण करण्यात येणार आहे. डीपीआरच्या मंजुरीनंतर तयार करण्यात आलेल्या डिझाईनचा बेस हा विदेशी रस्त्यांवर आधारित असून, वाहतूक नियंत्रणाची रचना असलेले उड्डाणपूल, भुयारी मार्ग, फुटपाथ, सायकलमार्ग, बसमार्ग, सरकते जिने आणि टॉयलेटस्च्या सुविधांसह वाहतूक पोलिसांसाठी विशेष कक्ष असलेला हा आराखडा आहे.
एनएचएआयचे डिझायनर धीरज देशमुख यांनी सांगितले की, जालना रोडचे डिझाईन सुरक्षित ड्रायव्हिंगच्या अनुषंगाने तयार केलेले आहे. वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, अशा दिशेने रोडवरील सर्व मुख्य चौक जोडण्यात आले आहेत. त्यामुळे शून्य अपघाताचा हा रोड असेल. प्रत्येक २५० मीटरवर फुटपाथ आणि ओव्हरब्रिजची तरतूद करण्यात आली आहे. सिटीबससाठी वेगळा ट्रॅक असणार आहे. स्मार्टसिटीसाठी त्याचा फायदा होईल. प्रत्येक फुटब्रिजला लिफ्टची व्यवस्था असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर ठरू शकेल. प्रत्येक फुटब्रिजलगत प्रसाधनगृहाची व्यवस्था असेल. फुटब्रिजच्या लिफ्ट सौरऊर्जेवर चालणाऱ्या असतील. उड्डाणपुलाखाली जागा रस्ता संचलन कार्यालय, लहान पार्किंग, पोलीस चौकी व इतर कार्यालयांसाठी असेल. यातून पालिकेला उत्पन्न मिळू शकेल. तसेच जाहिरात फलकांसाठी वेगळी जागा विकसित केली जाईल. यातून मिळणारे उत्पन्न रस्त्याच्या देखभालीसाठी वापरले जाईल. संकल्पित डिझाईननुसार जालना रोड आणि बीड बायपासचे काम झाले तर या शहरातील वाहतूक नियंत्रण करणारे रस्ते म्हणून या दोन्ही रस्त्यांची ओळख निर्माण होईल. त्यासाठी निविदा निघण्याची गरज आहे.