जालना रोड सहा पदरी करणार; ७५ कोटींची निविदा निघाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:54 PM2019-03-04T22:54:56+5:302019-03-04T22:55:22+5:30
जालना रोडचे काम ४०० कोटींहून २४५ कोटींत करा, नंतर ते १०४ कोटींमध्येच करण्याचे आदेश देण्यात आले आणि आता ७५ कोटीतच ते काम करण्यात येणार आहे. या कामाची निविदा नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाने काढली आहे. कंत्राटदार अंतिम होताच जालना रोड सहा पदरी करण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. रोड सहा पदरी करणे आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम यातून करण्यात येणार आहे.
औरंगाबाद : जालना रोडचे काम ४०० कोटींहून २४५ कोटींत करा, नंतर ते १०४ कोटींमध्येच करण्याचे आदेश देण्यात आले आणि आता ७५ कोटीतच ते काम करण्यात येणार आहे. या कामाची निविदा नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाने काढली आहे. कंत्राटदार अंतिम होताच जालना रोड सहा पदरी करण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. रोड सहा पदरी करणे आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम यातून करण्यात येणार आहे.
बीड बायपासचे काम एनएचएआयच्या अखत्यारीत येत नाही. त्यात शासकीय अडथळा निर्माण झाल्याचे सांगून बीड बायपासचा ३८९ कोटींचा प्रकल्पच रद्द करण्यात आला आहे. जालना रोडचे काम ७५ कोटीदरम्यान होणार आहे. जालना रोडचे रुंदीकरण होणार नाही. तसेच त्यावर बीटी सरफेसचे काम एनएचएआय करणार नाही. पेव्हर ब्लॉकसह एकेक पदर दोन्ही बाजूंनी वाढविण्यात येईल. रोडची लेव्हल एकच असेल, सहा पदरी रोड होईल. नगरनाका ते चिकलठाणापर्यंत रोडचे काम करण्यात येईल. दोन्ही बाजूंनी साडेतीन मीटरचा एक पदर वाढविण्यात येईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तविला.
जालना रोडच्या कामाचा प्रवास असा
डिसेंबर २०१५ मध्ये जालना रोड आणि बीड बायपाससाठी ७८९ कोटी रुपयांची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानंतर जून २०१८ मध्ये गडकरी यांनी दोन्ही प्रकल्पांसाठी २४५ कोटींची घोषणा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रपरिषदेत केली. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १०४ कोटींतून जालना रोडचे काम करण्याचा अंतिम निर्णय झाल्यानंतर आता जानेवारीत ७५ कोटीतूनच काम करण्याच्या सूचना केल्या गेल्या. फेबु्रवारी-मार्च महिन्यांत या कामासाठी निविदा काढण्यात आल्या.
जालना रोडसाठी आजवरच्या घोषणा
डिसेंबर २०१५ ४०० कोटी
जून २०१८ २४५ कोटी
डिसेंबर २०१८ १०४ कोटी
जानेवारी २०१९ ७५ कोटी
रोडवर करण्यात आले मार्किंग
जालना रोडच्या दोन्ही बाजूला पिवळ्या रंगाने मार्किंग करण्यात आले आहे. सदरील मार्किंग सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचएआय केंद्र व राज्य शासनाच्या विभागाने केलेले नाही. तिन्ही विभागांनी या मार्किंगशी संबंध नसल्याचे सांगितले. एनएचएआय सूत्रांनी सांगितले, जालना रोडच्या कामासाठी निविदा काढल्या आहेत; परंतु त्या अनुषंगाने कोणतेही मार्किंग रोडवर एनएचएआयने केलेले नाही.