औरंगाबादेत ऑनलाईन फसवणुकीचे 'जामतारा' मॉडेल उद्धवस्त; १ हजार मोबाईल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 11:48 AM2023-01-20T11:48:08+5:302023-01-20T11:48:36+5:30
डेहराडून पोलिसांची शहरात कारवाई : अनधिकृत कॉल सेंटरमधून तीन शिफ्टमध्ये चालत होते काम
औरंगाबाद : ऑनलाइन फसवणुकीसाठी देशभर बदनाम असलेल्या झारखंड राज्यातील जामतारा येथील मॉडेलनुसार ‘ऑनलाइन भारत पे’ ॲपद्वारे इन्स्टंट लोन घेणाऱ्याकडून पैसे वसूल करण्यासाठी देशभरात फसवणुकीचे जाळे निर्माण केलेले कॉल सेंटर बुधवारी रात्री उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई पैठण गेट परिसरातील यश इंटरप्राइजेस व संकल्प क्लासेस असलेल्या इमारतीत करण्यात आली. या कारवाईत १ हजारापेक्षा अधिक मोबाइल जप्त केले असून, दोन तलवारीही सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ऑनलाइन भारत पे ॲपद्वारे इन्स्टंट लोन दिल्यानंतर कर्जदारास शिवीगाळ करणे, धमक्या देणे, सोशल मीडियावर कर्जदारांचे छायाचित्रांचे मार्फिंग करून व्हायरल करण्याच्या प्रकारामुळे उत्तराखंडमधील डेहराडून शहरातील शेकडो नागरिक त्रस्त होते. ज्या मोबाइलवरून धमक्या देण्यात येत होत्या, त्याचे लोकेशन शहरातील पैठण गेट परिसरातील यश इंटरप्राइजेस व संकल्प क्लासेस असलेल्या इमारतीमध्ये दाखविण्यात येत होते. त्यामुळे डेहाराडून सायबर पोलिस निरीक्षकांचे एक पथक बुधवारी शहरात दाखल झाले. या पथकाने पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेऊन फसवणुकीची माहिती दिली.
तेव्हा डॉ. गुप्ता यांनी पथकाच्या मदतीसाठी गुन्हे शाखा, सायबर आणि क्रांती चौक पोलिसांचे पथक दिले. त्यानुसार यश इंटरप्राइजेस या इमारतीमध्ये छापा मारल्यानंतर त्या ठिकाणी दोन मजल्यांवरील खोल्यांमध्ये कॉल सेंटरमध्ये काम करणारी २०० पेक्षा अधिक तरुण मुले फोनवर फक्त शिवीगाळ करताना आढळून आली. त्याशिवाय सिल्लेखाना चौकातील संकल्प क्लासेसच्या इमारतीमधील दोन हॉल, एका खोलीतही तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत होते. दोन्ही ठिकाणच्या छाप्यात तब्बल १ हजारापेक्षा अधिक मोबाईल पोलिसांना सापडले. त्यातील डेहराडूनशी संबंधित ३२ पैकी २३ सिमकार्ड, ५ मोबाइल डेहराडून पोलिसांनी जप्त केले. उर्वरित गाेरखधंद्यावर कोणत्या कलमानुसार कारवाई करायची याचा खल आयुक्तालयात दिवसभर सुरू होता. हे सेंटर चालविणाऱ्या मालकाच्या कार्यालयात दोन तलवारीही सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.
१२ तासांपेक्षा अधिक वेळ कारवाई
डेहराडून पोलिसांसह शहर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर जप्त केलेल्या मोबाइल, तलवारींचे पंचनामे करण्यासह इतर प्रकारची शहानिशा करण्याची कारवाई १२ तासांपेक्षा अधिक काळ चालली. बुधवारी दुपारी सुरू झालेली कारवाई गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता संपल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कॉल सेंटरचा मालक पसार
बेकायदेशीर ऑनलाइन केंद्र चालविणारा जोहेब कुरेशी हा पसार झाला आहे. त्याने या कामासाठी शहरातील तब्बल ५०० पेक्षा अधिक युवकांना तीन शिफ्टमध्ये नोकरीवर ठेवले होते. देशभरातील विविध लोकांना इन्स्टंट लोन घेण्याच्या मोहात पाडून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा धंदाच याठिकाणी सुरू होता.
काय आहे जामतारा पॅटर्न ?
जामतारा हे झारखंड राज्यातील एक छोटे गाव. तेथील युवकांना फसवणुकीचा नवा व्यवसाय सापडला होता. भरपूर कार्ड खरेदी केल्यानंतर बकरे शोधून त्यांना फोन करायचे आणि बँकेचे अकाउंट साफ करायचे ही त्यांच्या गुन्ह्यांची पद्धत. ही सगळी मुलं १८ वर्षांच्या आतील, त्यामुळं कोणाचेही बँकेत अकाउंट नाही. त्यामुळं गावातील एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या नावानं अकाउंट सुरू करायचं आणि त्या खात्यात पैसे जमा करीत राहायचे आणि ते काढूनही घ्यायचे. सायबर पोलिसांनी बराच खटाटोप केल्यानंतर त्यांना जामतारा या गावातून सर्वाधिक फेक कॉल्स येतात व तेथूनच अधिक फसवणुकीचे प्रकार घडतात. हे लक्षात आल्यामुळे जामतारा देशभर ऑनलाइन फसवणुकीसाठी प्रसिद्ध झाले.