आज जन्माष्टमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:23 AM2017-08-14T00:23:30+5:302017-08-14T00:23:30+5:30
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त उद्या, १४ आॅगस्ट रोजी शहरात विविध ठिकाणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त उद्या, १४ आॅगस्ट रोजी शहरात विविध ठिकाणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इस्कॉनच्या वतीने सिडकोत दोन ठिकाणी जन्माष्टमी सोहळा होणार आहे, तर औरंगपुºयातील एकनाथ मंदिरात भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे. पैठण रोडवरील महानुभाव आश्रमावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
अग्रसेन भवनात महोत्सव
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) मध्यच्या वतीने सोमवारी (दि.१४) सिडको कॅनॉट प्लेस येथील अग्रसेन भवनात जन्माष्टमी महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
अध्यक्ष सीताराम अग्रवाल यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, रोहिणीनंद प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली जन्माष्टमी महोत्सव साजरा होत आहे. सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत कार्यक्रम चालतील. त्यात भजन व कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, शुभविलास प्रभूजी यांचे ‘कृष्ण जन्म का रहस्य’ यावर प्रवचन, पंचमहाअभिषेक, नाटिका सादरीकरण, त्यानंतर आरती व कीर्तन होईल. रात्री १२ वा. श्रीकृष्ण जन्माचा सोहळा साजरा केला जाईल. यावेळी विविध कार्यक्रमांसह सजीव देखावा पाहायला मिळेल. मध्यरात्री दहीहंडी फोडण्यात येईल. ५ हजार भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था येथे आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. संतोष मद्रेवार यांनी केले आहे. यावेळी राजकुमार अग्रवाल, विनोद बगाडिया, डॉ. रमेश लड्डा, डॉ. संदीप लोखंडे यांची उपस्थिती होती.