मोठी बातमी! ‘जनशताब्दी एक्स्प्रेस’ चा पुन्हा एकदा विस्तार; आता धावणार हिंगोलीहून
By संतोष हिरेमठ | Published: March 5, 2024 11:36 AM2024-03-05T11:36:56+5:302024-03-05T11:38:07+5:30
गेल्या काही महिन्यांपासून या रेल्वेचा विस्तार हिंगोलीपर्यंत करावा, अशी मागणी प्रवासी आणि रेल्वे संघटनांकडून करण्यात येत होती.
छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली हिंगोलीकरांची मागणी अखेर पूर्णत्वास जाणार आहे. जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसचा हिंगोलीपर्यंत विस्तार करण्यास रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. हिंगोली येथून रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्याचे नियोजन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून सुरू आहे.
राजेंद्र दर्डा हे मंत्री असताना त्यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याकडे पाठपुरावा केला आणि शहरातून मुंबईसाठी जनशताब्दी एक्स्प्रेस सुरू करून घेतली. पुढे या रेल्वेचा विस्तार जालन्यापर्यंत करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून या रेल्वेचा विस्तार हिंगोलीपर्यंत करावा, अशी मागणी प्रवासी आणि रेल्वे संघटनांकडून करण्यात येत होती. या रेल्वेला ७ मार्च रोजी हिंगोली येथे हिरवा झेंडा दाखवला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई ते जालना दरम्यानची सध्याची वेळ ‘जैसे थे’च ठेवून जालना ते हिंगोलीपर्यंतचे वेळापत्रक आणि थांबे लवकरच जाहीर केले जाणार आहेत.
लवकरच वेळापत्रक
जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार हिंगोलीपर्यंत होणार आहे. त्या संदर्भातील नोटिफिकेशन निघाले आहे. वेळापत्रक लवकरच जाहीर होईल.
- नीती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) नांदेड विभाग, ‘दमरे’
प्रवाशांची सोय
जनशताब्दी एक्स्प्रेसचा हिंगोलीपर्यंत विस्तार करण्यात येत आहे. ही रेल्वे हिंगोलीहून पहाटे ५:१० वाजता सुटणार असल्याचे समजते. यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. मुंबईचा प्रवास सोयीचा होईल. छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी आणखी एक रेल्वे सुरू होण्याची गरज आहे.
- अरुण मेघराज, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ