सुसाट होणार प्रवास, जालन्याहून लवकरच धावेल इलेक्ट्रिक इंजिनसह ‘जनशताब्दी एक्स्प्रेस’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 03:38 PM2023-04-03T15:38:39+5:302023-04-03T15:39:49+5:30
आता बदनापूरपर्यंत यशस्वी चाचणी : मनमाड ते बदनापूर १४१ कि.मी. रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते बदनापूरपर्यंत रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे धावण्याची चाचणीही यशस्वी झाली. आगामी महिनाभरात जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण होऊन इलेक्ट्रिक इंजिनसह जनशताब्दी एक्स्प्रेस धावेल, असा विश्वास रेल्वेच्या सूत्रांनी व्यक्त केला.
नव्या वर्षाच्या प्रारंभी म्हणजे जानेवारीत मनमाड ते छत्रपती संभाजीनगर या ९८ कि.मी.च्या लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ते जालन्यापर्यंतच्या विद्युतीकरणाच्या कामाला वेग देण्यात आला. यात आता बदनापूरपर्यंत म्हणजे आणखी ४३ कि.मी. रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले. छत्रपती संभाजीनगर ते बदनापूरपर्यंत शुक्रवारी इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे चालविण्याची चाचणीही घेण्यात आली. यावेळी ताशी १०० कि.मी.च्या वेगाने ही रेल्वे धावली. चाचणी यशस्वी झाली असून, आगामी महिनाभरात जालन्यापर्यंतचे काम पूर्ण होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मनमाड ते बदनापूर या १४१ कि.मी. रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आता जालन्यापर्यंतच्या जवळपास २० कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण बाकी असल्याचेही सांगण्यात आले.
मालगाड्यांना इलेक्ट्रिक इंजिन, नियमित रेल्वेंना प्रतीक्षा
छत्रपती संभाजीनगरहून मालगाड्या इलेक्ट्रिक इंजिनसह धावत आहेत. आता सर्वांचे लक्ष नियमित रेल्वेंकडे लागले आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस ही जालन्याहून धावते. त्यामुळे ही रेल्वे सर्वप्रथम इलेक्ट्रिक इंजिनसह धावेल, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. त्यासाठी जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे.