‘मेड इन औरंगाबाद’ची जपानभरारी, औरंगाबादेतील कंपनीचा जपानी बँकेशी करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 05:38 AM2017-11-23T05:38:57+5:302017-11-23T05:39:28+5:30
औरंगाबाद : जगभरात सॉफ्टवेअर उत्पादनात दबदबा अमेरिकेचा. भारतातील दिग्गज कंपन्याही तेथूनच सॉफ्टवेअर आयात करतात.
गजानन दिवाण
औरंगाबाद : जगभरात सॉफ्टवेअर उत्पादनात दबदबा अमेरिकेचा. भारतातील दिग्गज कंपन्याही तेथूनच सॉफ्टवेअर आयात करतात. हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न औरंगाबादने केला असून, मराठमोळ्या तरुणांनी तयार केलेली सॉफ्टवेअर लवकरच जपानच्या बाजारात दिसणार आहेत. यासंदर्भात औरंगाबादेतील ‘फाइंड अॅबिलिटि सायन्सेस’ कंपनीने अलीकडेच सॉफ्टबँक या जपानी कंपनीशी करार केला आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आनंद माहूरकर याने मोठ्या पगाराची नोकरी सोडून २०१० साली कंपनीची स्थापना केली. अमेरिकेतील बोस्टनमध्ये कंपनीचे मुख्यालय आहे. माहूरकर यांनी त्याचवर्षी कंपनीचे औरंगाबादेतही एक कार्यालय सुरू केले.
आनंद यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अंबाजोगाईत झाले. आई-वडील दोघेही शिक्षक. औरंगाबादेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले. पुढे पुण्यात नोकरी केली. त्याचवेळी संगणकाचे ज्ञान घेतले. नंतर औरंगाबादेत नोकरी केली. कंपनीने त्यांच्यातील सॉफ्टवेअर अभियंत्याचे गुण हेरून त्यांना मुंबईला एका विशेष प्रकल्पावर पाठविले. १९९९ साली पुन्हा पुण्यात नवी नोकरी केली. त्यानंतर मुंबईतील एका कंपनीच्या माध्यमातून थेट अमेरिका गाठली. कंपनीचा व्यवसाय २५ कोटींवरुन ३५० कोटींवर नेला.
आत्मविश्वास आल्यानंतर आपणच व्यवसायातून अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न का सोडवू शकत नाही, या विचारातून त्यांनी २०१० साली ‘फाइंड अॅबिलिटि सायन्सेस’ कंपनीची स्थापना केली. एकही पैशाची गुंतवणूक नाही. केवळ ‘आयडिया’ हीच त्यांची गुंतवणूक. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रात जगभरातील दिग्गजांच्या यादीत त्यांचे नाव पहिल्या काहींमध्ये घेतले जाते. हे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजे आपण कुठले कपडे घालायला पाहिजे, कुठली फॅशन सूट करते? तुमची पर्सनॅलिटी, तुमच्या विचारांचा अभ्यास करून कॉम्पुटरच तुम्हाला हे सांगेल. देशभरातील ४० प्रतिनिधींसमोर गुरुवार व शुक्रवारी औरंगाबादेत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा डेमो दाखविला जाणार आहे. लवकरच ही सॉफ्टवेअर औरंगाबादेत तयार केली जातील आणि जगभरात पुरविली जातील, अशी माहिती ‘फाइंड अॅबिलिटि सायन्सेस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहूरकर यांनी ‘लोकमत’ला दिली. सॉफ्ट बँक या जपानी कंपनीने माझ्या कंपनीत ५० कोटींची गुंतवणूक केली. भारतातील कंपनीशी हे एकमेव जॉइंट व्हेंचर केले आहे. औरंगाबादेत टेक्नॉलॉजी डेव्हलप करुन ती जपानमध्ये नेऊन ते विकतील. तेथे आपण त्यांना कंपनीचा ५१ टक्के भाग दिला आहे. तेथे मार्केटची पूर्ण जबाबदारी त्यांचीच असेल, असे माहूरकर यांनी सांगितले.
>औरंगाबादेतील एमआयटी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि जेएनईसीच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल. स्किल डेव्हलपमेंट केले जाईल. याच तरुणांना पुढे आपल्या कंपनीत सामावून घेतले जाईल.
- आनंद माहूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, फाइंड अॅबिलिटि सायन्सेस