वृक्षलागवडीच्या 'या' जपानी तंत्रज्ञानाने १० वर्षात होईल जंगल तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 04:21 PM2019-05-06T16:21:23+5:302019-05-06T16:36:04+5:30

अडीच महिन्यांत झाली रोपट्यांची ४ फुटांपेक्षा अधिक वाढ

The 'Japanese' technology of the tree plnatation will create a forest in 10 years | वृक्षलागवडीच्या 'या' जपानी तंत्रज्ञानाने १० वर्षात होईल जंगल तयार

वृक्षलागवडीच्या 'या' जपानी तंत्रज्ञानाने १० वर्षात होईल जंगल तयार

googlenewsNext
ठळक मुद्देएमआयटी महाविद्यालयातील प्राध्यापकांचा यशस्वी प्रयोग मिया वाकी तंत्रज्ञानात कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्यात येतात.

- राम शिनगारे 

औरंगाबाद : एमआयटी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत १९ फेब्रुवारी रोजी अवघ्या १२०० स्क्वे.फू. जमिनीमध्ये जपानी पद्धत म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेन्स फॉरेस्ट पद्धतीने ४१५ वृक्षांची लागवड केली. अवघ्या अडीच महिन्यांत वृक्षांची वाढ ४ फुटांपेक्षा अधिक झाली असल्याचे पाहायला मिळाले.

मराठवाड्यासह राज्यात सर्वत्र दुष्काळाने थैमान घातले आहे. प्रत्येकाला पाण्याचे आणि झाडांचे महत्त्व पटू लागले आहे. यासाठी आता प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, या हेतूने एमआयटीचे महासंचालक प्रा. मुनीष शर्मा आणि प्राचार्य डॉ. संतोष भोसले यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. प्रशांत आंबड यांना जपानी पद्धत डेन्स फॉरेस्टच्या मिया वाकी तंत्रज्ञानाने वनराई करण्यास सांगितले. हा प्रयोग महाविद्यालयात राबविण्यासाठी डॉ. शर्मा यांनी आवश्यक असलेले तंत्रज्ञान, साधने शहरातील काही संस्था, उद्योजकांकडून मिळवून दिले. यावर डॉ. आंबड यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी गौताळा अभयारण्यासह इतर ठिकाणांहून वृक्षांची लागवड करण्यासाठी बिया गोळा केल्या. या बियांचे रोपवाटिकांमध्ये रोपण केले. तोपर्यंत महाविद्यालयाच्या वसतिगृह परिसरात १,२०० स्क्वे.फू. जागेत दोन बाय दोन फूट असे खड्डे खोदले. वसतिगृहात वाया जाणारे पाणी वृक्षांना मिळेल याचे नियोजन केले. यासाठी आदित्य कुलकर्णी, नीलेश चौधरी, मौलाना खोत, आदित्य शर्मा, मनीष दुबे या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली, तसेच अ‍ॅड. महेश मुठाळ, समीर केळकर, बिजली देशम यांच्यासह संस्थेतील प्राध्यापक, प्राचार्यांनी मदत केल्याचे समन्वयक डॉ. आंबड यांनी सांगितले.

वृक्षातील अंतर आणि प्रकार
या पद्धतीने वृक्षांची लागवड करताना तीन फुटांचा खड्डा खोदला असला तरी त्यामध्ये दोन फुटांचे अंतर ठेवण्यात येते. प्रत्येकी दोन फुटांवर एक खड्डा खोदला जातो. यात वृक्षाची लागवड करताना कमी, माध्यम आणि जास्त उंचीच्या झाडांची निवड केली जाते, तसेच दोन फूट अंतर असल्यामुळे सगळ्या झाडांची मुळे एकमेकांना पूरक अशी ठरतात, असा दावाही डॉ. आंबड यांनी केला.

४८ प्रकारच्या वृक्षांची लागवड
एमआयटी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृह परिसरात लावलेल्या वृक्षांमध्ये ४८ प्रकारची रोपटी आहेत. सर्व भारतीय बनावटीची वृक्षे आहेत. यामध्ये पिंपळ, जास्वंद, अर्जुन, पिंपळ, आवळा, बोर, जांभूळ,  सागावन, निलगिरी, आंबा, चिंच अशा विविध प्रकारच्या वृक्षांचा समावेश आहे. ही रोपटे अल्पावधीत तरारूण आले आहेत. 

अशी घ्यावी लागते काळजी 
डेन्स फॉरेस्टच्या मिया वाकी तंत्रज्ञानात कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्यात येतात. यासाठी तीन फूट खोल खड्डा खोदला जातो. या खड्ड्यात तीन प्रकारचे थर मातीत मिसळून टाकावे लागतात. यात मातीचेही परीक्षण केले जाते. पहिल्या थरात शेणखत आणि  नाराळाच्या शेंड्या टाकण्यात येतात. दुसऱ्या थरात नाराळाच्या शेंड्यांचा भुसा करून भरण्यात येतो. त्यामुळे हवा खेळती राहते. पाणी साठवून ठेवण्याची क्षमताही वाढते. तिसºया थरात तांदळाची टरफले (साळ) टाकली जातात. या पद्धतीने तीन फूटांची खड्डा भरण्यात येतो. या  खड्ड्यांत रोपे लावण्यात आल्याचे डॉ. आंबड यांनी सांगितले.

अवघ्या दहा वर्षांत जंगल 
एक जंगल तयार होण्यासाठी शंभर वर्षे लागतात. मात्र, या जपानी पद्धतीने वृक्षांची लागवड केल्यास अवघ्या दहा वर्षांत जंगल तयार होईल. जपानमध्ये योकोहिमा विद्यापीठातील अकिरा मियावाकी यांनी ही किमया करून दाखवली, तर भारतात उत्तराखंड येथील शुभेंदू शर्मा यांनी ३३ जंगलांची निर्मिती या पद्धतीतून केली आहे. त्याच पद्धतीचा वापर आपण येथे करीत आहोत. प्रयोगाला मिळणारे यश पाहून प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा हुरूप वाढला आहे. 
- डॉ. संतोष भोसले, प्राचार्य, एमआयटी


 

Web Title: The 'Japanese' technology of the tree plnatation will create a forest in 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.