कोरोना काळात जार विक्री ८८ टक्क्यांनी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:04 AM2021-05-01T04:04:21+5:302021-05-01T04:04:21+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने शहर व परिसरात जारच्या पाण्याच्या विक्रीवर गडांतर आले आहे. कोरोनाचा फैलाव होतो की काय, ...
औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने शहर व परिसरात जारच्या पाण्याच्या विक्रीवर गडांतर आले आहे. कोरोनाचा फैलाव होतो की काय, अशा भीतीने अनेक काॅर्पोरेट कार्यालय, दुकान, शोरूम बंद असल्याने जार विक्री ८८ टक्क्यांनी घटली आहे.
हॉटेल, शॉप आणि घरगुती वापरातही जारच्या पाण्याचा उपयोग होत आहे. सातारा- देवळाई परिसरात कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना जारच्या पाण्याने आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे जार विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे; परंतु शहर व वाळूज चिकलठाणा, शेंद्रा परिसरात केवळ ७ ते ८ जारच्या पाण्याची नोंदणी अन्न औषधी विभागाकडे आहे. मात्र, विना परवाना २५० ते ३०० जारचे व्यावसायिक आहेत. आरोग्यासाठी घातक असलेली आणि खबरदारी न बाळगणाऱ्यांना तो व्यवसाय बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत; परंतु त्यांचा व्यवसाय जोमात वेगाने सुरू आहे.
मार्च २०१९ ला १ लाख जारच्या पाण्याची विक्री होती. मार्च २०२० ला ही कोरोनामुळे घसरून ती ४५ हजारांवर आली तर मार्च २०२१ ला ती १२ हजारांवर आली आहे. जार विक्री व्यवसायात असणाऱ्यांना ते कॉर्पोरेट कार्यालयात किंवा कारखाने, हॉटेल व्यवसायात पोहोच करण्यासाठी मनुष्यबळ लागते. उत्पादनापासून ते पाण्याचा जार पोहोचेपर्यंतची यंत्रणा राबविण्यात होत असलेला खर्चदेखील निघत नसल्याची अवस्था आहे.
अधिकृत नोंदणीचे ७ ते ८ उत्पादक
अधिकृतपणे शहर व वाळूज चिकलठाणा, शेंद्रा परिसरात केवळ आयएसआयची नोंदणी असलेले केवळ ७ ते ८ जार व्यावसायिक आहेत. मात्र, विना परवाना २५० ते ३०० जार व्यावसायिक आहेत. कोणतेही नियम पाळत नसल्याने त्यांच्यावर कारवाईदेखील झालेल्या आहेत. तरी गल्ली बोळात पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू झालेला आहे.
जार बंद केलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया...
- कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले असून, अत्यावश्यक दुकाने वगळता इतर शॉप बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचे जार बंद करावे लागले. व्यवसायच बंद असल्याने पाणी घेणे बंद केले.
- विक्रांत जैस्वाल
- पाणी घेताना मनात थोडीफार भीती निर्माण झाली असून, त्यामुळे साधे नळाचे गरम पाणी उकळून घरूनच आणले जाते. जार घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घेत निर्णय घेतला.
- अण्णासाहेब पाखरे
लॉकडाऊनमुळे व्यवसायात घट झाली असून, उद्योगात राबणाऱ्यांचे वेतन काढायला देखील कठीण झालेले आहे. बँकेचे हप्ते, इतर साहित्याची पूर्तता करताना व्यावसायिकांची कसरत होत आहे. व्यावसायिकांना शासनाकडून प्रोत्साहन मिळाले पाहिजे.
- रमेश मेहता (व्यावसायिक)
जार विक्रीचा आलेख...
-मार्च २०१९ ला १ लाख
-मार्च २०२० ला ४५ हजार
- मार्च २०२१ ला ती १२ हजार