‘जरांगे फॅक्टर’चा महायुतीच्या इतर उमेदवारांना झटका; पण 'भुमरेमामां’ना फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 12:14 PM2024-06-05T12:14:46+5:302024-06-05T12:44:07+5:30
मराठवाड्यातील सातही लोकसभा मतदारसंघांत जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत पाडा, असे जाहीर आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. जरांगे यांच्या आवाहनाचे प्रतिसाद देत मराठा समाजाने अनेक विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी केली होती. मराठवाड्यातील सातही लोकसभा मतदारसंघांत जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला. मात्र भुमरे यास अपवाद ठरले आणि त्यांना मराठा समाजाने भरभरून मतदान केल्याने ते विजयी झाले.
मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गतवर्षी अंतरवाली सराटी येथील उपोषण सुरू केले होते. तेव्हा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला आणि गोळीबार केला होता. या घटनेनंतर सरकार आणि आंदोलक यांच्यात संघर्ष झाला, तेव्हा रोहयोमंत्री भुमरे हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी येथे वारंवार जात. जरांगे पाटील आणि भुमरे यांचे जुने नाते असल्याने जरांगे हे त्यांना ‘भुमरेमामा’ म्हणतात. भुमरे यांनीही अनेकदा यशस्वी मध्यस्थी केली.
भुमरे हे नेहमी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेत असतात. हे जरांगे पाटील यांना पटल्याने या ‘मामा-भाच्या’तील नाते अधिक दृढ झाले. लोकसभा निवडणूक जाहीर झाली, तेव्हा सगेसोयऱ्यांचा कायदा करा, अशी मागणी जरांगे यांनी लावून धरली. तेव्हा त्यांना अनेक नेत्यांनी विरोध केला होता. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला पाडा, असे जाहीर आवाहन जरांगे यांनी केले होते. मराठवाड्यातील सातही लोकसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टर चालला आणि सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. पण जरांगे पाटील यांचे आवाहन भुमरे यांना मात्र लागू झाले नाही. यामुळे मराठा समाजाने भुमरे यांना भरभरून मतदान करीत त्यांना विजयी केले.