मोंढ्यातून जाधववाडीत स्थलांतरास व्यापारी राजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 06:18 PM2018-07-06T18:18:11+5:302018-07-06T18:23:43+5:30
मोंढ्यातील ११९ व्यापाऱ्यांनी जाधववाडीत प्लॉट घेण्यासाठी गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे प्रत्येकी साडेतीन लाख रुपयांचे धनादेश सुपूर्द केले.
औरंगाबाद : मोंढ्यातील ११९ व्यापाऱ्यांनी जाधववाडीत प्लॉट घेण्यासाठी गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे प्रत्येकी साडेतीन लाख रुपयांचे धनादेश सुपूर्द केले. यामुळे मोंढा स्थलांतराच्या दिशेने आज एक पाऊल पडले. परिणामी, प्लॉट देण्यापूर्वीच बाजार समितीच्या तिजोरीत सव्वाचार कोटी जमा झाले आहेत. मात्र, सर्व शासकीय परवानग्या असलेला निर्विवाद प्लॉट दिला, तरच उर्वरित रक्कम देऊ, अशी अटही व्यापाऱ्यांनी घातली.
मोंढ्यातील शेतीनियमित मालाच्या किरकोळ व होलसेल व्यवहाराचे जाधववाडीत स्थलांतराचे घोंगडे मागील १९ वर्षांपासून भिजत पडले आहे. मात्र, गुरुवारी मोंढ्यातील ११९ व्यापाऱ्यांनी कृउबा समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांच्याकडे धनादेश सोपवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार जाधववाडीतील गट नंबर ५ येथील जागेवर मोंढ्यातील ११९ व्यापाऱ्यांना प्लॉट देण्यात येत आहेत. १ जुलै रोजी मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी सोडत काढून प्लॉट वाटून घेतले. ठरल्याप्रमाणे पहिला ४ लाख रुपयांचा हप्ता कृउबाला द्यायचा होता. यापूर्वी मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी प्रत्येकी ५० हजार रुपये कृउबाकडे जमा केले आहेत.
आज ५ रोजी सकाळी मोंढ्यातील जनरल किराणा मर्चन्टस् असोसिएशनचे संजय कांकरिया, नीलेश सेठी, राजेंद्र शहा, संचालक हरीश दायमा, प्रशांत सोकिया, विक्की सुराणा, मुन्ना चांदीवाल आदींनी बाजार समिती सभापती राधाकिशन पठाडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे धनादेश सुपूर्द केले. मात्र, त्याचसोबत काही अटी असलेले निवेदनही दिले. यात म्हटले आहे की, धनादेश वटल्यावर व्यापाऱ्यांना प्लॉट नंबर टाकून प्रत्येकाला अलॉटमेंट लेटर द्यावे.
कृउबाने ३० मार्च २०१९ पर्यंत सर्व परवानग्यांसह निर्विवाद प्लॉट व्यापाऱ्यांच्या ताब्यात द्यावेत, असोसिएशनचे पत्र पाहूनच प्रत्येक व्यापाऱ्याच्या प्लॉटचे लीज डीड करावे आदी मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय जाधववाडीतील २० व्यापाऱ्यांनी प्रत्येकी ४ लाख रुपयांचा पहिला धनादेश बाजार समितीकडे सुपूर्द केला आहे.
दीड वर्षात मोंढा स्थलांतर करणार
११९ व्यापाऱ्यांनी व जाधववाडीतील २० व्यापाऱ्यांनी दोन टप्प्यात रक्कम देण्याचे मान्य केले. दुसऱ्या टप्प्यात ७६ प्लॉट इतर व्यापाऱ्यांना देण्यात येतील. सर्व शासकीय परवानग्या मिळवून देण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. येत्या दीड वर्षात मोंढा स्थलांतर करू.
- राधाकिशन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती