१ कोटी रुपये किमतीचा सासऱ्याचा प्लॉट बनावट सह्या करून जावयाने विकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:04 AM2021-07-27T04:04:56+5:302021-07-27T04:04:56+5:30
औरंगाबाद : आकाशवाणी परिसरात असलेला अंदाजे एक कोटी रुपये किमतीचा १ हजार ७५० चाैरस फुटाचा प्लॉट जावयाने बनावट सह्या ...
औरंगाबाद : आकाशवाणी परिसरात असलेला अंदाजे एक कोटी रुपये किमतीचा १ हजार ७५० चाैरस फुटाचा प्लॉट जावयाने बनावट सह्या करून परस्पर तिसऱ्याच व्यक्तीला विकला आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी सासऱ्याच्या तक्रारीनंतर जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहर कॉलनी येथील रहिवासी विजय हिरालाल अग्रवाल (वय ६१) यांचा आकाशवाणी परिसरातील सर्व्हे नंबर १० मध्ये १७५० चौरस फुटांचा प्लॉट आहे. हा प्लॉट त्यांनी २०१२ मध्ये अंबादास भानुदास मात्रे यांच्याकडून खरेदी केला होता. ६ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांनी हा प्लॉट व्यंकट पिराजीराव मालेगावे यांना नोंदणीकृत भाडे करारनामा करून ३६ महिन्यांकरिता गॅरेजच्या वापरासाठी दिला होता. हा करारनामा करताना साक्षीदार म्हणून विजय अग्रवाल यांचे जावई नीलेश प्रेमकुमार अग्रवाल हे होते.
२० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता जावई नीलेश अग्रवाल हे विजय हिरामन पडवळ, संजय अर्जुनदास डावरानी यांच्यासह तीन अनोळखी पुरुष आणि
चार महिलांसह गॅरेजवर आले. तेव्हा नीलेश अग्रवालने भाडेकऱ्यास सांगितले की, हा प्लॉट विजय पडवळ व संजय डावराणी यांना कायमस्वरूपी विक्री केला आहे, तुम्ही येथून निघून जा. परत येऊ नका, असे बजावले. या घडलेल्या घटनेची माहिती मालेगावे यांनी मालक विजय अग्रवाल यांना दिली. ते तात्काळ घटनास्थळी पोहचले. तेव्हा त्या ठिकाणी असलेला सुशील भिसे व इतर चार महिलांनी हा प्लॉट तात्काळ खाली करा, तुमच्या जावयाकडून खरेदी केला आहे. अन्यथा तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. विजय अग्रवाल यांनी त्यांच्याकडे या प्लॉटच्या जागेच्या विक्रीची कागदपत्रे मागितली असता, त्यांनी आम्ही कोणतीच कागदपत्रे दाखवणार नाहीत, तुला काय करायचे आहे ते करून घे आणि जागा खाली करी अशी धमकी दिली. या घटनेनंतर विजय अग्रवाल यांनी घरात प्लॉटची मूळ कागदपत्रे शोधली असता जावयाने ती चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. तसेच रजिस्ट्री ऑफिसमध्ये माहिती घेतली असता, जावयाने खोट्या सह्या करून माझ्या खऱ्या असल्याचे भासवून पडवळ व डावरानी यांच्या नावे प्लॉट करून दिल्याचे दिसून आले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे करीत आहेत.
चौकट,
मुलाप्रमाणे वागणूक दिली पण...
विजय अग्रवाल यांचा प्लॉट बनावट सह्या करून विक्री करणारा जावई पत्नीस सतत मारहाण करून त्रास देत होता. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून मुलगी वडिलांकडेच राहत आहे. त्यांची ही एकुलती एक मुलगी असून, तिला दोन मुले आहेत. मुलाप्रमाणे वागणूक दिलेल्या जावयानेच धोका दिला असल्याची खंतही विजय अग्रवाल यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.
चौकट,
गॅरेज मालकाची पोलीस आयुक्तांकडे धाव
तीन वर्षांसाठी भाडेकरार करुन गॅरेजचे दुकान टाकलेले व्यंकट मालेगावे यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देत गुंड प्रवृत्तींच्या लोकांपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. हे गुंड लोक गॅरेजमध्ये येऊन धमकावत असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.